अमरावतीमधील सोनगाव शिवारात उतरले लष्कराचे एअर बलून, ग्रामस्थांमध्ये कुतूहल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 20:30 IST2018-12-01T20:13:12+5:302018-12-01T20:30:10+5:30
भारतीय सैन्य दलाचे एअर बलून हवेच्या अतिरिक्त दाबामुळे तालुक्यातील निंभारी ते सोनगाव दरम्यान शिवारात शनिवारी दुपारी अचानक उतरले.

अमरावतीमधील सोनगाव शिवारात उतरले लष्कराचे एअर बलून, ग्रामस्थांमध्ये कुतूहल
- सुदेश मोरे
अमरावती - भारतीय सैन्य दलाचे एअर बलून हवेच्या अतिरिक्त दाबामुळे तालुक्यातील निंभारी ते सोनगाव दरम्यान शिवारात शनिवारी दुपारी अचानक उतरले. तालुक्यात हा कुतूहलाचा विषय ठरला होता. यादरम्यान देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांचा रूबाब प्रत्यक्ष पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
जमिनीपासून सुमारे १० हजार फुटांवरून प्रवास करणारे हे एअर बलून १० ते १२ जवान घेऊन काश्मीर ते कन्याकुमारी, असा प्रवास करीत होते. परतवाडा येथून अकोल्याला ते निघाले होते. परंतु, हवेच्या अतिरिक्त दाबामुळे तांत्रिक दोष निर्माण झाल्याने सैन्य अधिकाऱ्यांनी एअर बलूनचे आकस्मिक लँडिंग केले. तेथूनच सैन्य अधिकाऱ्यांना मदतीसाठी बोलावण्यात आले. वाहनाने बलूनसह जवानांना अकोला येथे नेण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, बलून उतरत असल्याचे फार लांबून दिसल्याने गावोगावच्या नागरिकांनी या एअर बलूनभोवती गर्दी केली होती. सैन्याच्या जवानांना भेटल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यांवर झळकत होते.
परतवाडा येथे प्रात्यक्षिक
शुक्रवारी सकाळी ‘मिशन जयभारत’ अंतर्गत परतवाडा शहरात दाखल झालेल्या एअर बलूनचे प्रात्यक्षिक जवानांनी दाखविले. परेड ग्राऊंडवर विद्यार्थी, एनसीसी कॅडेट, शिक्षक, नागरिकांना यात बसण्याची, वर आकाशात उडण्याची संधी जवानांनी उपलब्ध करून दिली. एकूण ५२ जवानांच्या या तुकडीचे नेतृत्व लेफ्टिंनंट कर्नल विवेक अहलावत करीत आहेत.