आमदारांची दत्तक शाळा, उपरसे टामटूम...!
By Admin | Updated: November 18, 2016 00:11 IST2016-11-18T00:11:02+5:302016-11-18T00:11:02+5:30
खासगी शाळांच्या तुलनेत महापालिका शाळांचा घसरलेला दर्जा उंचावण्यासाठी राज्यात सर्वदूर दत्तक शाळेचा अभिनव प्रयोग राबविला जात आहे.

आमदारांची दत्तक शाळा, उपरसे टामटूम...!
शिक्षणाचा बट्याबोळ : रुख्मिणीनगर शाळेचा चार विद्यार्थ्यांवर डोलारा
प्रदीप भाकरे अमरावती
खासगी शाळांच्या तुलनेत महापालिका शाळांचा घसरलेला दर्जा उंचावण्यासाठी राज्यात सर्वदूर दत्तक शाळेचा अभिनव प्रयोग राबविला जात आहे. मात्र, या प्रयोगाला अमरावतीमध्ये काहींनी नख लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. स्थानिक आमदार सुनील देशमुख यांनी दत्तक घेतलेल्या रूख्मिणीनगर शाळा क्रमांक १९ ची अवस्थाही ‘उपरसे टामटूम अंदरकी राम जाने ’अशीच झाली आहे.
महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या शाळांना आता गरीब आणि दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांच्या शाळा असे नवे नामाभिधान मिळाले आहे. राज्यात सर्वदूर खासगी शाळांची चलती असल्याने महापालिका आणि जिल्हा परिषद शाळांची अधोगती झाली आहे. केंद्र आणि राज्य शासन शिक्षणावर कोट्यवधी रूपयांचा खर्च करीत असले तरी याशाळांची दर्जात्मक वाढ खुंटली आहे. यावर उपाययोजना म्हणून राज्यशासनाने गतवर्षी दत्तक शाळांचा प्रयोेग राबविण्याची संकल्पना मांडली. प्रत्येक आमदाराने आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा दत्तक घेऊन त्याशाळांचे पालकत्व स्वीकारावे, त्याशाळांच्या दर्जात्मक आणि गुणात्मक वाढीकडे लक्ष पुरवावे, अशी ती संकल्पना होती.
त्यानुसार आ. सुनील देशमुख यांनी महापालिकेची रूख्मिणीनगर शाळा क्रमांक १९ ची जबाबदारी स्वीकारली. आमदारांच्या माध्यमातून याशाळेचा कायापालट करण्याची जबाबदारी महापालिकेच्या शिक्षण विभागाची व तेथील मुख्याध्यापक, शिक्षकांची आहे. मात्र, प्रत्यक्षात याशाळेत बाह्य रंगरंगोटीशिवाय अन्य कुठलीही सुधारणा दिसून आली नाही. त्यामुळे संख्यात्मक, गुणात्मक आणि दर्जात्मक सुधारणेचा प्रश्नच उद्भवत नाही.
पटावर ३४, उपस्थिती चौघांची
पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग असलेल्या याशाळेकडे मोठे पटांगण आणि विस्तीर्ण असा परिसर आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याने शिकवायचे तरी कुणाला, असा प्रश्न मुख्याध्यापकासह तीन शिक्षकांना पडला आहे. येथे पहिलीत ७, दुसरीत ५, तिसरीत १०, तर चौथी आणि पाचवीत प्रत्येकी ६ अशी एकूण ३४ मुले आहेत. मात्र, प्रत्यक्षात गुरुवारी पहिली दुसरी आणि तिसरी मिळून केवळ ४ विद्यार्थी उपस्थित होते. केवळ अनुदान आणि शिक्षकांची नोकरी टिकविण्यासाठी शाळा सुरू असल्याचा केवळ देखावा केला जात असल्याचे शाळेच्या या स्थितीवरून दिसून आले.