लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अकोट (जि. अकोला) तालुक्यातील गुल्लरघाट येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील एक १५ वर्षीय मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब वैद्यकीय तपासणीनंतर पुढे आली. गुरुवारी सायंकाळी पीडित मुलीला अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले गेले. त्यावेळी कोतवाली ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षकाने पीडिताचे बयाण नोंदविले. त्यानुसार आरोपींविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून हे प्रकरण पुढील तपासाकरिता हिवरखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तूर्तास त्या मुलीवर जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत.उन्हाळ्याच्या सुटीत ५ एप्रिल रोजी सदर मुलगी अकोला जिल्ह्यातील तिच्या घरी गेली होती. तेथील दोन तरुणांनी लैंगिक शोषण केल्याचे बयाण तिने कोतवाली पोलिसांना दिले आहे. १ जुलै रोजी ती वसतिगृहात परतली त्यावेळी तेथे तिची नियमित तपासणी करण्यात आली असता, मासिक पाळी आली नसल्याचे आढळले. त्यामुळे तिला दर्यापूर येथील रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळी ती मुलगी दोन ते तीन महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. वसतिगृहाच्या अधीक्षक एस.बी. पाटील यांनी त्या मुलीला गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे आणले. याबाबत इर्विन चौकीला कळविल्यावरून पोलीस कर्मचारी गणेश कावरे यांनी पीडित मुलीची चौकशी केली. त्यानंतर घटनेची माहिती ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्या माहितीच्या आधारे कोतवाली ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कान्होपात्रा बन्सा यांनी पीडित मुलीचे बयाण नोंदविले. पोलिसांनी झिरोची डायरी कायमी करून हे प्रकरण हिवरखेड पोलिसांकडे रवाना केले.पीडित मुलीचे बयाण नोंदविण्यात आले. तिच्या जबाबानुसार आरोपींविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपासासाठी हे प्रकरण हिवरखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.- शिवाजी बचाटे, पोलीस निरीक्षक, कोतवाली ठाणे.१ एप्रिल ते १ जुलै दरम्यान ही मुलगी घरी गेली होती. त्यानंतर नियमित तपासणीत तिची मासिक पाळी चुकल्याचे निदर्शनास आले. वैद्यकीय तपासणीनंतर ती गर्भवती असल्याचे समजले. पुढील चौकशी पोलीस करीत आहेत.- एस.बी. पाटील, अधीक्षक, आदिवासी मुलींचे वसतिगृह (गुल्लरघाट)
अमरावती जिल्ह्यातल्या अकोटच्या वसतिगृहातील आदिवासी मुलगी गर्भवती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 11:39 IST
गुल्लरघाट येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील एक १५ वर्षीय मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब वैद्यकीय तपासणीनंतर पुढे आली.
अमरावती जिल्ह्यातल्या अकोटच्या वसतिगृहातील आदिवासी मुलगी गर्भवती
ठळक मुद्देबलात्काराचा गुन्हा दाखल अमरावती पोलिसांनी नोंदविला गुन्हा