अवैध गौण खनिज कारवाईत अचलपूर अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:14 IST2021-04-27T04:14:09+5:302021-04-27T04:14:09+5:30
अनिल कडू परतवाडा : अवैध गौण खनिज कारवाईत अचलपूर तालुका अमरावती जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. यात गत आर्थिक वर्षात ...

अवैध गौण खनिज कारवाईत अचलपूर अव्वल
अनिल कडू
परतवाडा : अवैध गौण खनिज कारवाईत अचलपूर तालुका अमरावती जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. यात गत आर्थिक वर्षात एकूण ९५ कारवायांमध्ये ८४ लाख १९ हजार ६५० रुपयांचा दंड आदेशित करण्यात आला आहे. यात विविध प्रकारच्या ८९ वाहनांसह सहा अवैध रेती साठ्यांवर भरारी पथकाने कारवाई केली आहे.
अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या या ८९ मध्ये चार व्हॅन, ३३ ट्रॅक्टर व ५० ट्रकचा समावेश आहे. यात ५० कारवाया रेतीच्या वाहनांवर करण्यात आल्या असून, त्यावर ६३ लाख ४३ हजार २०० रुपये दंड आदेशित करण्यात आला आहे.
दरम्यान, २० कारवाया मुरमाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर असून, या वाहनांवर १६ लाख ३७ हजार ९०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. १९ कारवाया मातीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर असून, त्यावर ४ लाख ३८ हजार ५५० रुपये दंड आकारण्यात आला आहे.
गत आर्थिक वर्षातील या कारवायांसोबतच नवीन आर्थिक वर्षातील चालू महिन्यात सहा वाहनांवर कारवाई करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार मदन जाधव, नायब तहसीलदार शंकर श्रीराव, गणेश संगारे, व पथकातील सर्व मंडळ अधिकारी, सर्व तलाठी आणि कोतवाल यांनी ही कारवाईची मोहीम राबविली.