अचलपूर विधानसभेकरिता भाजपकडून इच्छुकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:25 PM2019-07-03T23:25:42+5:302019-07-03T23:26:08+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीकरिता अचलपूर मतदारसंघात भाजपकडून इच्छुकांची गर्दी वाढत आहे. प्रहार तटस्थपणे ‘अपना भिडू’वर थांबली आहे, तर लोकसभेनंतर रिपाइंचे डॉ. राजेंद्र गवई यांच्या आग्रही भूमिकेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे गणित बिघडणार आहे. काँग्रेसकडून तेच परंपरागत उमेदवार चर्चेत आहेत.

For the Achalpur assembly elections, the crowd of enthusiasts | अचलपूर विधानसभेकरिता भाजपकडून इच्छुकांची गर्दी

अचलपूर विधानसभेकरिता भाजपकडून इच्छुकांची गर्दी

Next
ठळक मुद्देप्रहार तटस्थ : रिपाइंमुळे आघाडीचे गणित बिघडणार

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : आगामी विधानसभा निवडणुकीकरिता अचलपूर मतदारसंघात भाजपकडून इच्छुकांची गर्दी वाढत आहे. प्रहार तटस्थपणे ‘अपना भिडू’वर थांबली आहे, तर लोकसभेनंतर रिपाइंचे डॉ. राजेंद्र गवई यांच्या आग्रही भूमिकेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे गणित बिघडणार आहे. काँग्रेसकडून तेच परंपरागत उमेदवार चर्चेत आहेत. राष्ट्रवादीकडूनही जुनेच नाव पुढे केले जात असले तरी हा पक्ष नव्या उमेदवाराच्या शोधात आहे, तर शिवसेना प्रतीक्षेत आहे. भाजप-सेना युतीत अचलपूर शिवसेनेला मिळण्याची शिवसैनिकांना आशा आहे. दरम्यान, इच्छुकांची भाऊगर्दी होत असली तरी मतदारसंघ कुणाच्या वाट्याला येतो यानंतर पुढे बघू, असा सबुरीचा सल्ला भाजपाचे पक्षश्रेष्ठी देत आहेत.
अचलपूर मतदारसंघात भाजपकडून नेहमीच माळी समाजाला प्राधान्य दिले गेले. या अनुषंगाने दिवंगत माजी राज्यमंत्री विनायकराव कोरडे यांचे चिरंजीव प्रमोद कोरडे, मागील पराभूत उमेदवार अशोक बन्सोडे, अचलपूरच्या नगरसेविका अक्षरा लहाने, सुधीर रसे, गजानन कोल्हे, रूपेश ढेपे, साहेबराव काठोळे, डॉ. राजेश उभाड यांची नावे पुढे येत आहेत.
काँग्रेसकडून बबलू देशमुख, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुरेखा ठाकरे, वसुधा देशमुख, संगीता ठाकरे, अचलपूरचे नगरसेवक सल्लूभाई यांची नावे चर्चेत आहेत. रिपाइंतर्फे खुद्द डॉ. राजेंद्र गवई आग्रही आहेत. प्रत्येक निवडणुकीत उभे राहण्याचा छंद जोपासून असलेले अचलपूरचे माजी नगराध्यक्ष अरुण वानखडे यांचे नावही मागे नाही.
शिवसेनेकडून २००९ आणि २०१४ मध्ये अचलपुरात उमेदवार दिला गेला. २०१९ च्या निवडणुकीकरिता विद्यमाननगराध्यक्षा सुनीता फिसके तयारीत आहेत. दरम्यान, अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे मागील तीन निवडणुकांपासून प्रहारचे आमदार बच्चू कडू प्रतिनिधित्व करित आहेत. २०१९ ची निवडणूकही प्रहारकडून तेच लढणार आहेत. इतर राजकीय पक्ष कुणाला उमेदवारी देतात, यावरही निकाल अपेक्षित राहणार आहे.
ठळक मुद्दे : अचलपूर जिल्हानिर्मिती, शकुंतला ब्रॉडगेज, मोठा उद्योग, सपन प्रकल्प.
पावणेतीन लाख मतदार
अचलपूर विधानसभा मतदारसंघात २ लाख ७२ हजार ८६४ मतदार आहेत. यात १ लाख ४१ हजार ३५७ पुरुष, तर १ लाख ३१ हजार ५०३ महिला मतदार आहेत. अचलपूर मतदारसंघात अचलपूर व चांदूर बाजार असे दोन तालुके आहेत. एकूण ३०६ मतदान केंद्रांपैकी अचलपूर तालुक्यात ८७ शहरी व ३० ग्रामीण आणि चांदूर बाजार तालुक्यातील १७ शहरी व १७२ ग्रामीण मतदान केंदे्र आहेत. २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये मतदारांची संख्या १९ हजार ५६९ ने वाढली आहे. एकट्या अचलपूर नगरपालिका क्षेत्रात ८७ हजार मतदार आहेत.
जिल्हा निर्मितीचा मुद्दा
निवडणूकीच्या अनुषंगाने अचलपूर मतदार संघातील अनेक प्रलंबीत प्रश्न, समस्या, मागण्या पुढे येऊ लागल्या आहेत. यात अचलपूर जिल्हा निर्मितीचा प्रश्न, शकुंतलेच्या ब्रॉडगेजची मागणी या प्रामुख्याने वारंवार मांडले जातात. याशिवाय बंद पडलेला वासणी मध्यम प्रकल्प, सपन प्रकल्प पूर्ण होऊन सिंचनाकरिता अर्धवट पडलेली वितरण प्रणाली पूर्ण करण्याची मागणीही जुनीच आहे. कॅनॉलची कामे, सपन प्रकल्पातून गावांची पाणीपुरवठा योजना, सरकारी वैद्यकीय महाविद्यालयासह कृषी महाविद्यालयाची मागणी, सिंचनाच्या अपुऱ्या सोयी, गावपातळीवर भेडसावणारी पाणीसमस्या, ग्रामीण व शहरी भागातील मतदारसंघातील रस्त्यांची दुर्दशा, संत्रा प्रक्रिया केंद्र, मतदारसंघातील औद्योगिक वसाहतीत न आलेला एकही मोठा उद्योग यांसह अनेक प्रश्न भावी उमेदवारांपुढे उभे ठाकले आहेत.

Web Title: For the Achalpur assembly elections, the crowd of enthusiasts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.