११०० ग्रॅम गांजासह अटकेतील आरोपीला शिक्षा; २५ हजारांचा दंडही ठोठावला

By प्रदीप भाकरे | Updated: August 29, 2025 16:46 IST2025-08-29T16:44:35+5:302025-08-29T16:46:54+5:30

जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय : वलगावचे तत्कालिन ठाणेदार अवचार यांचे यश

Accused arrested with 1100 grams of ganja sentenced; fined Rs 25,000 | ११०० ग्रॅम गांजासह अटकेतील आरोपीला शिक्षा; २५ हजारांचा दंडही ठोठावला

Accused arrested with 1100 grams of ganja sentenced; fined Rs 25,000

अमरावती : येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने एका गांजा विक्रेत्यास तीन वर्षे सक्तमजुरी, २५ हजार रुपये दंड व न भरल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक १ आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने शुक्रवार दि. २९ ऑगस्ट रोजी हा निर्णय सुनावला. गजानन भिमराव उमेकर, (वय ६५ वर्ष रा. रेवसा, वलगाव, ता. जि. अमरावती) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे. एनडीपीएसच्या गुन्हयात शिक्षा लागण्याचे हे अलिकडच्या काळातील पहिलेच ‘कन्व्हेक्शन’ ठरले आहे. वलगावचे तत्कालिन ठाणेदार बाबाराव अवचार यांनी त्यावेळी त्या गांजा विक्रेत्याविरूद्ध स्ट्रॉंग दोषारोपपत्र दाखल केले होते.

दोषारोपपत्रानुसार, ३ मे २०२० रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास ती कारवाई करण्यात आली होती. आरोपी हा त्याच्या राहत्या घरी अवैधरित्या गांजा विक्री करित असल्याची माहिती वलगावचे ठाणेदार बाबाराव अवचार यांना मिळाली होती. धाडीदरम्यान आरोपीच्या घरी एकुण ११०० ग्रॅम गांजा मिळून आला होता. एनडीपीएस कायद्यानुसार आरोपीला त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली तथा आरोपीविरूद्ध दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात सहायक सरकारी वकिल गजानन खिल्लारे व सहायक सरकारी वकिल मंगेश भागवत यांनी कामकाज पाहिले.

सात साक्षीदार तपासले

या प्रकरणात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील दोन साक्षीदारांना फितूर घोषित करण्यात आले. सहायक सरकारी वकील मंगेश भागवत यांनी केलेला युक्तीवाद तसेच फिर्यादी पीआय बाबाराव अवचार व अन्य साक्षीदारांनी दिलेली साक्ष विद्यमान न्यायालयाने ग्राह्य मानली. तथा आरोपी गजानन उमेकर याला दोषी ठरविण्यात आले. पैरवी अधिकारी म्हणून एएसआय. बाबाराव मेश्राम व एएसआय प्रविण म्हाला यांनी काम पाहिले. संजय यादव यांनी सहकार्य केले.

Web Title: Accused arrested with 1100 grams of ganja sentenced; fined Rs 25,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.