आमदार यशोमती ठाकूर यांच्या वाहनाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 15:43 IST2018-07-17T15:42:30+5:302018-07-17T15:43:27+5:30
जीवितहानी नाही, अनर्थ टळला

आमदार यशोमती ठाकूर यांच्या वाहनाला अपघात
तिवसा (अमरावती) : अमरावती येथून नागपूर विधिमंडळात जात असताना आमदार यशोमती ठाकूर यांच्या वाहनाला अपघात झाला. ही घटना तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी १०.३० वाजता महामार्गावरील महामार्गावरील वरखेड फाट्यानजीक घडली. मात्र, सुदैवाने अनर्थ टळला. याप्रकरणी राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाहीच्या बसचालकावर तिवसा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर या एम एच ०९ एटी ४००५ क्रमांकाच्या कारने पावसाळी अधिवेशनासाठी नागपूरकडे जात होत्या. दरम्यान परिवहन महामंडळाच्या शिवशाही बस क्रमांक एम एच- २९ बीई ०८०५ या बसने आ.ठाकूर यांच्या वाहनाला कट मारल्याने त्या थोडक्यात बचावल्या. यावेळी यशोमती ठाकूर यांनी शिवशाही बसचालकांला चांगलेच धारेवर धरले. शिवशाही बसने अतिशय जीवघेणा कट मारला. त्यामध्ये १८ प्रवासी, तसेच कारमध्ये आ. यशोमती ठाकूर,राजीव ठाकूर, स्वप्निल देशमुख व वाहनचालक सागर खांडेकर प्रवास करीत होते. ते थोडक्यात बचावले. या अपघातात त्यांची कार रस्त्यावरून १० फूट खाली उतरली होती. ही चूक शिवशाही बसचालक सय्यद शादाब अली याने केली, असे प्रवास्यांनी मान्य केले. तिवसा पोलीस ठाण्यात याप्रकरणी आ. ठाकूर यांच्यावतीने नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी शिवशाहीचे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शिवशाहीचा चालक बेजबाबदारपणे वाहन चालवीत होता. त्यामुळे माझ्या वाहनासहीत शिवशाही बससुद्धा पलटी होणार होती. मात्र, सुदैवाने संकट टळले. त्यामुळे प्रवासी थोडक्यात बचावले.
- यशोमती ठाकूर, आमदार, तिवसा मतदारसंघ