पोलीस असल्याची बतावणी करून लुटणारा गजाआड; १ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त
By प्रदीप भाकरे | Updated: June 29, 2023 17:30 IST2023-06-29T17:30:07+5:302023-06-29T17:30:33+5:30
फ्रेजरपुरा पोलिसांची यशस्वी कारवाई

पोलीस असल्याची बतावणी करून लुटणारा गजाआड; १ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त
अमरावती : वॉकिंग करीत असलेल्या एका वृध्दाला पोलीस असल्याची बतावणी करून लुटणाऱ्या आरोपीला फ्रेजरपुरा पोलिसांनी तत्काळ अटक केली. त्याच्याकडून लुटलेला ऐवज व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परेश अशोक नांदूरकर (२९, रा. वडधामना, नागपूर, ह. मु. उदय कॉलनी, अमरावती) असे अटक आरोपीचे नाव आहे.
स्थानिक श्यामनगर येथील रहिवासी गजानन मेश्राम (६०) हे २८ जून रोजी सायंकाळी ६ वाजता वॉकिंगकरिता गेले होते. राजकमल चौक येथून पायदळ घरी येत असताना त्यांनी मागून आलेल्या एका दुचाकीस्वाराला लिफ्ट मागितली. त्यावेळी दुचाकीस्वाराने त्यांना मालटेकडी मार्गावर नेले. त्या ठिकाणी त्याने गजानन मेश्राम यांच्याकडील ४२ हजार रुपये किमतीची ७ ग्रॅम सोन्याची अंगठी व रोख ५ हजार रुपये हिसकाविले. आरोपीचे तेवढ्यावरच समाधान झाले नाही. त्यांना जबरीने तो एटीएमवर घेऊन गेला.
२० हजार काढण्यास केले बाध्य
आपण पोलीस आहोत, अशी बतावणी करून त्या तोतयाने गजानन मेश्राम यांना रूख्मिनीनगर भागातील विजय कॉलनी येथील एका एटीएमवर नेत त्यांना २० हजार रुपये काढायला भाग पाडले. त्यानंतर ती रक्कम हिसकावून त्याने पळ काढला. घटनेनंतर गजानन मेश्राम यांनी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. या गुन्ह्यात परेश नांदूरकर याचा हाथ असल्याचे समोर आल्यावर घटनेनंतर काही तासांतच त्याला अटक करण्यात आली.
अटक करताच पोपटासारखा बोलू लागला
फ्रेजरपुरा पोलिसांनी खाकीचा बडगा उगारताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून लुटलेली सोन्याची अंगठी, रोख २५ हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. ठाणेदार गोरखनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी कर्मचारी योगेश श्रीवास, हरिष बुंदेले, श्रीकांत खडसे, हरिष चौधरी, धनराज ठाकूर यांनी ही कारवाई केली.