डोळ्यावर दुपट्टा बांधून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग, गळाही आवळला
By प्रदीप भाकरे | Updated: June 13, 2023 13:25 IST2023-06-13T13:24:13+5:302023-06-13T13:25:20+5:30
मोर्शी तालुक्यातील घटना

डोळ्यावर दुपट्टा बांधून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग, गळाही आवळला
अमरावती : विश्वासाने ज्याच्यासोबत लग्नाकरीता गेली, त्याच भामट्याने एका अल्पवयीन मुलीवर घराकडे परतताना अतिप्रसंग केला. ११ जून रोजी दुपारी चारच्या सुमारास मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन पिडिताच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी आरोपी अजय इसन धुर्वे (२१, रा. तरोडा, ता. मोर्शी) याच्याविरूध्द १२ जून रोजी दुपारी बलात्कार, धमकी व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीने शेतशिवारातील नाल्यात नेताना तिचे डोळे दुपट्ट्याने बांधले. तथा तिचा गळा देखील आवळला.
तक्रारीनुसार, आरोपी व फिर्यादी मुलगी परस्परांच्या ओळखीचे आहेत. त्यामुळे ११ जून रोजी मोेठ्या विश्वासाने एका लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी ती त्याच्यासोबत गेली. लग्न लाऊन दोघेही दुचाकीने परत येत असताना आरोपीने तिला शेतशिवारामधील एका पांदन रस्त्याने शेताजवळील नाल्याजवळ नेले. तेथे तिला धमकावून डोळयाला दुपटटा बांधला. तथा तिचा गळा दाबून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
तर तुझीच बदनामी होईल
याबाबत तू कुणालाही सांगितले तर, माझी नव्हे तर तुझी बदनामी होईल. मी तुला जिवाने मारून टाकीन अशी धमकी त्याने दिल्याची पिडिताने तक्रारीत म्हटले आहे. पिडिताने आरोपीच्या तावडीतून कसाबसा पळ काढून घर जवळ केले. त्यावेळी तिला तिचे मोठे वडिल दिसले. ती त्यांच्यासोबत सुरक्षितरित्या घरी गेली. ती घरी परतल्यानंतर तिच्या मामीने घडलेली घटना तिच्या आईला सांगितली. तिची आई बाहेरगावहून परत आल्यानंतर १२ जून रोजी दुपारी त्या मायलेकीने पोलीस ठाणे गाठले.