सडकसख्याहरीच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2023 21:13 IST2023-01-18T21:13:21+5:302023-01-18T21:13:47+5:30
Amravati News सडकसख्याहरीच्या जाचाला कंटाळून १७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची खळबळजनक घटना तळेगाव दशासर ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली.

सडकसख्याहरीच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीने घेतला गळफास
अमरावती : सडकसख्याहरीच्या जाचाला कंटाळून १७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची खळबळजनक घटना तळेगाव दशासर ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. १७ जानेवारी रोजी सायंकाळी ५.१५ ते ५.३० च्या सुमारास तिने घरातच मृत्यूला कवटाळले. याप्रकरणी तिच्या पित्याच्या तक्रारीवरून तळेगाव दशासर पोलिसांनी आरोपी तौफिक शेख हाफीज शेख (२३, रा. तळेगाव दशासर) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
पित्याच्या तक्रारीनुसार, आरोपी हा युवतीला महिनाभरापासून त्रास देत होता. तिचा पाठलाग करीत होता. ही बाब तिने तिच्या चुलतभावाला सांगितली असता, त्यांनी आरोपीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. १७ जानेवारी रोजी ती कुटुंबातील सदस्यांसह तालुक्यातील एका यात्रेत गेली. तेथे तो तिच्या मागे फिरत होता आणि हाताने इशारे करीत होता. त्यावरून तिच्या चुलतभावाने आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर ते सर्व जण घरी परतले. मात्र, यात्रेदरम्यान घडलेल्या त्या घटनेमुळे ती अत्यंत खजील झाली. अशातच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी १८ जानेवारी रोजी दुपारी तौफिकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तळेगाव दशासरचे ठाणेदार हेमंत चौधरी यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मिश्रा, पोलिस अंमलदार गजेंद्र ठाकरे, मनीष आंधळे, मनीष कांबळे करीत आहेत.