देशभरातील किन्नारांचे अमरावतीत संमेलन; कलश यात्रा काढली, अंबादेवी, एकवीरा देवीची भरली ओटी
By गणेश वासनिक | Updated: January 9, 2023 15:43 IST2023-01-09T15:41:53+5:302023-01-09T15:43:27+5:30
नागरिकांच्या सुख शांतीसाठी केली प्रार्थना; ढोल-ताशांच्या गजर, जागोजागी किन्नारांचे स्वागत

देशभरातील किन्नारांचे अमरावतीत संमेलन; कलश यात्रा काढली, अंबादेवी, एकवीरा देवीची भरली ओटी
अमरावती : देशभरातील मंगलमुखी किन्नारांचे १ ते १५ जानेवारी दरम्यान राष्ट्रीय संमेलन अमरावतीत होत आहे. याच श्रृखंलेत सोमवारी शहरातील प्रमुख मार्गावरून कलश यात्रा काढण्यात आली. अंबादेवी, एकवीरा देवीची पूजा अर्चा करून किन्नरांनी ओटी भरली. कलश यात्रेत ढोल ताशे, ढोल- नगारा, डीजेवर किन्नारांनी सादर केलेले नृत्य लक्ष वेधून घेणारे होते.
अमरावतीच्या धर्मादाय कॉटन फंड येथे गत नऊ दिवसांपासून हे संमेलन सुरु आहे. देशभरातून ग्वालियर, दिल्ली, ईंदूर, द्रुर्ग, आग्रा, मुंबई, नागपूर, हैद्राबाद, बंगळुरू, अकोला यासह अनेक शहरातून साडेतीन हजाराच्यावर किन्नरांनी या संमेलनाचा हजेरी लावलेली आहे. या मेळाव्याला मंगलमुखी संमेलन असे नाव देण्यात आलेले आहे. सोमवारी सर्व किन्नरांनी धर्मदाय कॉटन फंडपासून अंबादेवीपर्यंत कलश यात्रा काढली. यात नाचत गाजत किन्नर हे देवीच्या दर्शनाला गेले. अंबादेवी व एकवीरा देवीच्या मंदिरात किन्नरांनी ओटी भरली तसेच कलश अर्पण केले.
डीसीपी देणार ‘परी’च्या पंखाना बळ; क्षणात स्विकारले 'त्या' कन्येचे शैक्षणिक पालकत्व
डोक्यावर चांदीचा कलश अन् फुलांचा वर्षाव
काेरोनानंतर पहिल्यांदाच अमरावती येथे संमेलनाच्या माध्यमातून किन्नर एकवटले आले आहे. सोमवारी काढलेल्या कलश यात्रेत किन्नरांनी डोक्यावर चांदीचा कलश होता. जागोजागी किन्नरांच्या कलश यात्रेवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. खुल्या जीपमध्ये आयोजकांसह काही प्रमुख किन्नर बसले होते. यावेळी चौका-चौकात किन्नारांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान प्रभात चौकात किन्नारांनी फुगडीचा फेरही धरला. कलश यात्रेच्या बंदोबस्तासाठी पोलिस उपायुक्त विक्रम साळी हे स्वत: हजर होते.
देशभरातील नागरिकांना सुख समृद्धी लाभो यासाठी ही कलश यात्रा काढण्यात आली आहे. राष्ट्रीत स्तरावरील पहिल्यांदाच अमरावती येथे किन्नरांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यात किन्नरांच्या विविध समस्या, प्रश्नांवर मंथन केले जाणार आहेत.
- सोना नायक, आयोजक, किन्नर संमेलन