दारूसाठी पैसे न दिल्याने जन्मदात्रीला संपविले, दारूड्या मुलाचा प्रताप
By प्रदीप भाकरे | Updated: March 2, 2024 16:54 IST2024-03-02T16:53:36+5:302024-03-02T16:54:04+5:30
भोकरबर्डी येथील घटना.

दारूसाठी पैसे न दिल्याने जन्मदात्रीला संपविले, दारूड्या मुलाचा प्रताप
प्रदीप भाकरे,अमरावती : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने जन्मदात्या आईवर काठीने हल्ला चढवून तिची हत्या केली. ही धक्कादायक घटना १ मार्च रोजी रात्री धारणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोकरबर्डी येथे घडली. या प्रकरणी आरोपी मुलाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. गंगाबाई मोतीराम जांबेकर (६०, रा. भोकरबर्डी असे मृतक तर पवनकिशोर मोतीलाल जांबेकर (२३) असे आरोपीचे नाव आहे.
गंगाबाई यांना शासनाच्या एका योजनेमार्फत नुकतेच काही पैसे मिळाले. याबाबत कळल्यावर शुक्रवारी रात्री पवनकिशोर याने आई गंगाबाई यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु, घरावर टीन टाकायचे असल्याचे सांगून गंगाबाई यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे पवनकिशोर याने आई गंगाबाई याच्यासोबत वाद घातला. या वादात त्याने आई गंगाबाई यांच्यावर काठीने हल्ला चढविला. त्यात गंभीर जखमी झालेल्या गंगाबाई ह्या खाली कोसळल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. गंगाबाई व त्यांचा मुलगा पवनकिशोर यांच्यात नेहमीच वाद होत असल्याने त्यावेळी शेजाऱ्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे गंगाबाई ह्या रात्रभर तशाच पडून होत्या.
सकाळी उघड झाली घटना :
शनिवारी सकाळी हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आला. त्यानंतर घटनेची माहिती धारणी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच धारणीचे ठाणेदार अशोक जाधव यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी पवनकिशोरविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.