मद्यपीने केला मोठ्या भावाचा खून, डोक्यावर सब्बलने वार करून केले ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 17:47 IST2023-04-03T17:47:17+5:302023-04-03T17:47:45+5:30
शहापूर येथील घटना

मद्यपीने केला मोठ्या भावाचा खून, डोक्यावर सब्बलने वार करून केले ठार
मोहन राऊत
धामणगाव रेल्वे (अमरावती) : दारूच्या नशेत नेहमीप्रमाणे वाद घालत असलेल्या मोठ्या भावाचा धाकट्याने सब्बलच्या प्रहाराने खून केला. धामणगावातील शहापूर येथे रविवारी रात्री १० वाजता ही घटना घडली. महेंद्र नंदकिशोर धुर्वे (३०) असे मृताचे नाव आहे.
तर किरण नंदकिशोर धुर्वे (२३) असे आरोपीचे नाव आहे. किरणला दारूचे व्यसन जडले होते. व्यसनाधीन होऊन घरी परतल्यानंतर तो महेंद्रसोबत नेहमी वाद घालत असे. दारूमुळे पत्नी व दोन मुले त्याला सोडून माहेरी निघून गेले होते. रविवारी रात्री १० च्या सुमारास झालेल्या वादावादीत किरणने महेंद्राच्या डोक्यात सब्बल मारली. त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडून तो जागीच मृत्युमुखी पडला. या घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचानामा केला व आरोपी किरणला अटक केली.
मृत महेंद्र याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहेत. सोमवारी किरणला धामणगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला धामणगाव दिवाणी फौजदारी न्यायालयाने एका दिवसाची कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास दत्तापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे करीत आहेत.