७८ वर्षांत २५ नगराध्यक्ष
By Admin | Updated: October 28, 2016 00:20 IST2016-10-28T00:20:10+5:302016-10-28T00:20:10+5:30
येथे सन १९३७ मध्ये म्युन्सिपल कमिटी मंजूर झाली. प्रथम नगराध्यक्षपदी अप्रत्यक्षरीत्या ब्रिटिश सरकारने नरहर गोविंद देशपांडे यांना...

७८ वर्षांत २५ नगराध्यक्ष
नऊ वेळा प्रशासक नियुक्त : तीन नगराध्यक्ष यावलकर कुटुंबातील
संजय खासबागे वरूड
येथे सन १९३७ मध्ये म्युन्सिपल कमिटी मंजूर झाली. प्रथम नगराध्यक्षपदी अप्रत्यक्षरीत्या ब्रिटिश सरकारने नरहर गोविंद देशपांडे यांना नियुक्त करून १३ सदस्यांची समिती राजपत्रित केली. पहिले नियोजित अध्यक्षांचा कार्यकाळ एक वर्षाचा होता. तो कालावधी पूर्ण होताच सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. यामध्ये लोकशाही पद्धतीतून जागोजी राघोजी आंडे अध्यक्ष म्हणून निवडून आलेत. स्थापनेपासून तर आजपर्यंच्या ७८ वर्षांच्या काळात नगरपरिषदेने २५ नगराध्यक्ष आणि ९ प्रशासकाचा काळ पाहिला आहे.
यामध्ये लक्ष्मणराव बेलसरे यांचा नगराध्यक्षपदाचा सर्वाधिक काळ १७ वर्षे ९ महिन्यांचा आहे, यावलकर कुटुंबातील ३ लोकांनी नगराध्यक्षपद भुषविले. यामुळे बेलसरे, यावलकर यांचेच नगरपरिषदेवर वर्चस्व राहिले. ७४ वर्षांच्या काळात काँग्रेसने अधिक काळ सत्ता उपभोगली तर कालांतराने काँगे्रसचे विभाजन होऊन राष्ट्रवादी काँग्रेस उदयास आली. लक्ष्मणराव बेलसरे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवून नगराध्यक्षपद सांभाळले होते. सन २००६ च्या निवडणुकीत मतदारांनी शिवसेनेला कौल दिला. सन २०११ च्या निवडणुकीत सेनेची सत्ता येऊन हेमलता कुबडे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. त्यांच्या अडीच वर्षांनंतर तत्कालीन जनसंग्राम पक्षाचे रवींद्र थोरात नगराध्यक्षपदी विराजमान झाले. ते आजतागायत पदावर कार्यरत आहेत. १६ वर्षांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक होत असल्याने मिनी आमदारकी मिळविण्याकरिता अनेक चेहरे पुढे येत आहेत. स्वातंत्र्याचा पूवार्ध आणि उत्तरार्ध पाहणारी वरूड नगर पालिका आहे. सन २००६ च्या निवडणुकीत पहिल्यांदा शिवसेनेला स्पष्ट बहुमतात सत्ता मिळाली. यामध्ये अंतरिम सत्तेचे पहिले नियोजित नगराध्यक्ष म्हणून नरहर गोविंद देशपांडे यांना वर्षभरासाठी नियुक्त करण्यात आले. त्यांचा कार्यकाळ २४ आॅक्टोबर १९३८ पर्यंत होता. दुसरे नियोजित अध्यक्ष खंडेराव काळे हे आॅक्टोबर १९३८ ते १० जुलै १९३९ पर्यंत अध्यक्ष होते. यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जागोजी आंडे हे जुलै १९३९ ते सप्टेंबर १९४६, एम.व्ही. चौधरी नोव्हेंबर १९४६ ते आॅक्टोबर १९५१ आणि नोव्हेंबर १९५२ ते जून १९५९ पर्यंत दोन वेळा अध्यक्षपदी विराजमान झाले होते. विश्राम श्रावणजी यावलकर हे सन १९५९ ते १९६२ , बी.टी खेरडे १९६२ ते १९६५, विश्राम यावलकर १९६५ ते १९६७, लक्ष्मणराव सखारामजी बेलसरे १९६७ ते १९७४, आत्माराम यावलकर नोव्हेंबर १९७४ ते मे १९७९. यानंतर मे १९७९ पासून तर सन १९८० पर्यंत प्रशासक एम.के.मिश्रा यांनी कारभार पाहिला.
पुन्हा थेट निवडणुकीतून फॉरवर्ड ब्लॉकच्या उमेवारीवर आत्माराम यावलकर १९८० ते फेब्रुवारी १९८१ पर्यंत नगराध्यक्ष होते. त्यानंतर पुन्हा राजकीय अस्थिरतेमुळे प्रशासक नेमण्यात आले. चार वर्षे प्रशासकीय अधिकारात नगरपरिषदेचा कारभार चालला. नंतर निवडणूक होऊन शिवसेनेचे दिनेश खेरडे मे १९८६ मध्ये नगराध्यक्षपदी आरुढ झाले. त्यानंतर डिसेंबर १९८६ पासून लक्ष्मणराव बेलसरे १७ नोव्हेंबर १९८७ पर्यंत नगराध्यक्षपदी विराजमान झाले. सुहास चौधरी हे नोव्हेंबर १९८७ ते १९ नोव्हेबर १९९० पर्यंत नगराध्यक्षपदी आले. नंतर लक्ष्मणराव बेलसरे सन १९९४ पर्यंत नगराध्यक्ष राहिले. संजय यावलकर निवडून येऊन नोव्हेंबर १९९४ ते डिसेंबर १९९६ पर्यंत नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होेते. त्यानंतर सन २००१ पर्यंत महिला नगराध्यक्ष झाल्या. यानंतर पुन्हा थेट नगराध्यक्षांची निवडणूक झाली. यामध्ये लक्ष्मणराव बेलसरे निवडून आलेत. पश्चात सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या बाजूने मतदारांनी कौल दिला आणि जया नेरकर या अडीच वर्षांच्या कार्यकाळात नगराध्यक्ष आणि नंतर १७ जून २००९ पासून राजू रामहरी काळे नगराध्यक्षपदी विराजमान होते. सन २०११ मध्ये शिवसेनेच्या हेमलता कुबडे अडीच वर्षांच्या काळाकरीता आणि नंतरचे नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीकरिता राखीव असल्याने विदर्भ जनसंग्रामचे रवींद्र थोरात नगराध्यक्ष झाले आहेत.