अमरावती : रहाटगाव परिसरातील एका रेस्टॉरेन्ट ॲन्ड बारसमोर ५५ वर्षीय व्यक्तीची चाकुने भोसकून हत्या करण्यात आली. १२ जुलै रोजी पहाटे ३.४५ च्या सुमारास ती घटना घडली. राजकुमार तहलराम सुंदरानी (५५, रा. रामपुरी कॅम्प, अमरावती) असे मृतकाचे नाव आहे. ओळखीतील व्यक्तींनी राजकुमार यांचा खून केल्याचे सीसीटिव्हीतून स्पष्ट झाले असले तरी मारेकरी फरार झाल्याने हत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. नांदगाव पेठ पोलिसांनी मृताचा भाऊ प्रकाश सुंदरानी (६४) यांच्या तक्रारीवरून १२ जुलै रोजी दुपारी २.१७ च्या सुमारास संशयित बंटी पवार (३०, रा. विलासनगर) आणि शिवा फुलवानी (४२, रा. रामपुरी कॅम्प) या दोघांसह त्यांच्या इतर साथीदाराविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. राजकुमार यांना घरी भेटायला येणाऱ्या शिवा फुलवानी व अन्य काही मित्रांना आपण ओळखत असल्याचे प्रकाश यांनी फिर्यादीत म्हटले आहे. राजकुमार सुंदरानी हे मोठे भाऊ प्रकाश, आई व इतर सदस्यांसोबत राहत होते. ते अविवाहित होते. मिळेल ती मजुरी करणाऱ्या राजकुमार यांना दारु पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे किरकोळ काम करुन मिळालेल्या पैश्यातून दारु प्यायची आणि रात्री बेरात्री ते घरी यायचे.एफआयआरनुसार, ११ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता बंटी पवार, शिवा फुलवानी हे घरासमोर आलेत. त्यानंतर या दोघांसह राजकुमार घरुन निघून गेले. दरम्यान शनिवारी सकाळी ८.३० वाजता राजकुमार यांचे मोठे बंधू प्रकाश सुंदरानी आपल्या घरी हजर असताना पोलिसांनी राजकुमार यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. राजकुमार यांच्या मांडीवर चाकूचा घाव असून यातच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
स्टारंट अँड बारसमोर ओळखीच्या व्यक्तींकडूनच ५५ वर्षीय व्यक्तीची हत्या, मारेकऱ्यांचे चेहरे उलगडले, कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 20:55 IST