धामणगाव रेल्वे : तालुक्यात आतापर्यंत ५५ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. ६७ हजार जणांनी लस घेतली. उर्वरित नागरिकांच्या लसीकरणासाठी आरोग्य विभाग धडपडत आहे. यासाठी नागरिकांना पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याचे आरोग्य विभागाकडून शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर लगेच लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. धामणगाव तालुक्यात ग्रामीण भागात एकूण लसीकरण ४९ हजार ९३ जणांना देण्यात करण्यात आले. प्रथम डोज ३८ हजार ६५, तर दुसरा डोज १० हजार ८९५ जणांना देण्यात आला. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागाचे कर्मचारी व अधिकारी, दुसऱ्या टप्प्यात नगरपंचायत, महसूल, पोलीस विभाग हे फ्रन्टलाइन वर्कर, तर तिसऱ्या टप्प्यामध्ये ६० वर्षांवरील वयोगट, ४५ ते ६० वर्षे वयोगट, ३० ते ४४ वर्षे वयोगट, १८ ते ३० वर्षे वयोगट आणि १८ ते ४५ वर्षे वयोगट असे वर्गीकरण करून लसीकरण करण्यात आले. ५ फेब्रुवारी ते १८ ऑगस्ट २०२१ पर्यंत ५५ टक्के लसीकरण पूर्ण झाले असून, आरोग्य विभाग उर्वरित लसीकरण्यासाठी गावोगावी विविध उपायोजना करीत आहे. ॉ
--------------
तालुक्याचा रिपोर्ट निरंक
लसीकरणासाठी निंबोली, अंजनसिंगी, मंगरूळ दस्तगीर, तळेगाव दशासर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारे वैद्यकीय अधिकारी तसेच तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रांतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सरपंच, उपसरपंच हे लसीकरणासाठी गावोगावी पुढाकार घेऊन कर्तव्य पार पाडत आहेत. सद्यस्थितीत तालुक्यामध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. गेल्या महिन्यात तालुक्याचा रिपोर्ट हा निरंक आहे.
-----------------
धामणगाव शहरात ८० टक्के लसीकरण
धामणगाव शहरात ११ हजार १३६ जणांना पहिला डोज, तर ६ हजार ३६४ जणांना दुसरा असे एकूण १७ हजार ५५० जणांना दोन्ही डोज देण्यात आले आहेत. शहरात ८० टक्के लसीकरण झाले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश साबळे यांनी दिली.
-----------------
लसीकरणासाठी तालुक्यामध्ये सर्व नियोजन केले आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गरोदर महिला, स्तनदा माता यांनीही लसीकरण करून घ्यावे. यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न सुरू आहे.
डॉ. हर्षल क्षीरसागर, तालुका आरोग्य अधिकारी, धामणगाव रेल्वे