फोटो पी १९ तिवसा
तिवसा : येथील पंचवटी चौकातून प्रत्येकी २०० नग डिटोनेटर व जिलेटिन कांड्या तिवसा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. गुरुवारी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
सदर जिलेटिन व डिटोनेटरचा वापर कशासाठी करण्यात येणार होता, इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटके कुठे पोहोचविली जात होती, हे अद्याप अनुत्तरित असले तरी पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांना तातडीने माहिती देण्यात आली. ग्रामीण पोलिसांनी एका आरोपीला अटक केली, तर एक आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला.
ठाणेदार रीता ऊईके यांच्यानुसार, तिवसा पोलिसांना गुरुवारी रात्री नागपूरहून काही इसम दुचाकीवरून दारूची वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, तिवसा येथील वाहतूक अंमलदार प्रवीण चव्हाण व विशाल सूर्यवंशी यांनी पंचवटी भागात नाकाबंदी केली. तेवढ्यात दुचाकीवर जात असलेल्या दोघांना पोलिसांनी थांबण्याची सूचना केली. मात्र ते पळाले. त्यांचा पाठलाग केला असता, पंचवटी चौकापासून थोड्या दूर अंतरावर ते पोत्यातील साहित्य फेकून पळून गेले. फेकलेल्या साहित्याची पाहणी केली असता, ती स्फोटके असल्याचे लक्षात आले.
दरम्यान, पोलिसांनी माहिती काढली असता, तो पळालेला युवक सुमीत अनिल सोनोने (रा. सातरगाव, ता. तिवसा) असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विचारपूस केली असता, त्याने ती २५ किलो स्फोटके, डिटोनेटर हे अंकुश लांडगे (रा. करजगाव लोणी) याला विकल्याची कबुली दिली. पंचवटी चौकाजवळच्या एका विहिरीच्या परिसरातून पोलिसांनी दोनशे नग जिलेटिन व दोनशे नग डिटोनेटर हस्तगत केले. याप्रकरणी सुमीत सोनवणे याला अटक करण्यात आली. अंकुश लांडगे नामक आरोपी पसार झाला. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम २८६, आरडब्ल्यू स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ५, ९, (ब), (१) अन्वये गुन्हा दाखल केला.
गुन्हे शाखेची कारवाई
यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रेसनोट जारी करण्यात आली. त्यात तिवसा येथील पंचवटी चौकात अज्ञात व्यक्तींनी २०० नग जिलेटिन व २०० नग डिटोनेटर असे स्फोटक पदार्थ फेकून पळ काढला. त्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विजय गराड, सहायक उपनिरीक्षक मूलचंद भांबूरकर, कर्मचारी सुनील केवतकर, बळवंत दाभणे आदींनी आरोपीचा शिताफीने शोध घेतला. सुमीत सोनोने याने ती स्फोटके अंकुश लांडगे याला विकल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी म्हटले.
कोट
नाकाबंदीदरम्यान दोन पोलिसांनी चौकशी केली. दोन आरोपी दुचाकी घेऊन पळाले. त्यांचा पाठलाग केला असता, त्यांनी स्फोटके विहिरीजवळ फेकून दिली. चौकशीअंती आरोपींची संख्या चारवर जाऊ शकते. सदर साहित्य हे विहीर ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येत होते, असे आरोपीकडून सांगण्यात आले. ती स्फोटके जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे.
-रीता उईके, पोलीस निरीक्षक तिवसा