३६ पाणवठे भागवितात वन्यप्राण्यांची तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:42 IST2019-05-10T00:42:13+5:302019-05-10T00:42:59+5:30
यंदा चिरोडी, पोहरा, वडाळी, मालेगाव, चांदूर रेल्वे, बडनेरा, भातकुली या वनवर्तुळाच्या वनक्षेत्रात नैसर्गिक व कृत्रिम असे ३६ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची रेलचेल असल्याची छायाचित्रे कैद झाली.

३६ पाणवठे भागवितात वन्यप्राण्यांची तहान
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा बंदी : यंदा चिरोडी, पोहरा, वडाळी, मालेगाव, चांदूर रेल्वे, बडनेरा, भातकुली या वनवर्तुळाच्या वनक्षेत्रात नैसर्गिक व कृत्रिम असे ३६ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची रेलचेल असल्याची छायाचित्रे कैद झाली.
चिरोडी वर्तुळात नैसर्गिक व कृत्रिम सात, पोहरा वर्तुळात सहा, वडाळी वर्तुळात सात, मालेगाव वर्तुळात नैसर्गिक सहा पाणवठे, बडनेरा वर्तुळात नैसर्गिक तीन पाणवठे, भातकुली वर्तुळात नैसर्गिक तीन पाणवठे, चांदूर रेल्वे वर्तुळात नैसर्गिक चार असे मिळून दोन्ही वनपरिक्षेत्राच्या वर्तुळात एकूण ३६ पाणवठे आहेत. चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांच्या मार्गदर्शनात दोन्ही वनपरिक्षेत्रातील पाणवठ्यांची देखरेख व स्वच्छता होत आहे. वन कर्मचाऱ्यांची नियमित गस्त असल्याने जंगलात शिरण्याचे कुणीही धाडस करीत नाहीत. त्यामुळे वडाळी आणि चांदूर रेल्वे जंगलातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात येत असल्याचे दिसून आले.
दोन्ही वनपरिक्षेत्रांत वन्यप्राण्यांचे वास्तव्य
बिबट, हरिण, रोही, चिकारा, भेडकी, चितळ, काळवीट, देवगाई, रानडुक्कर, लांडोर, ससे, मोर, सायल व इतर पशूपक्ष्यांचे वास्तव्य आढळून आले आहेत. या वन्यप्राण्यांना पाण्याची कमतरता भासू नये, याकरिता दोन्ही वनपरिक्षेत्राच्या जंगलात नैसर्गिक व कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत.