३० क्विंटल तांदूळ ट्रकमधून घेऊन जात होते, पोलिसांनी पाठलाग केला अन्
By प्रदीप भाकरे | Updated: October 19, 2022 17:27 IST2022-10-19T17:10:26+5:302022-10-19T17:27:05+5:30
दर्यापूर फाट्याजवळ पोलिसांची कारवाई

३० क्विंटल तांदूळ ट्रकमधून घेऊन जात होते, पोलिसांनी पाठलाग केला अन्
अमरावती : पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या विशेष पथकाने बुधवारी वलगाव ठाण्याच्या हद्दीतील दर्यापूर फाट्याहून एका ट्रकमधून सुमारे ३० हजार ५४० किलो तांदूळ जप्त केला. त्या तांदळाच्या अधिकृततेबाबत संबंधित ट्रकचालक समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने ती कारवाई करण्यात आली.
एम एच ४० बी एल ७१०७ क्रमांकाच्या ट्रकमधून तांदळाची अवैध वाहतूक होत असल्याच्या माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरिक्षक योगेश इंगळे यांच्या पथकाने सिराज खान महमूद खान (२५, रा. खोलापुर ता. भातकुली) याला ताब्यात घेतले. ७ लाख ७५ हजार रुपये किमतीचा तांदूळ विक्री करिता तो गोंदिया येथे नेत असताना मिळून आला.
त्याला मालाच्या मालकाबाबत विचारपूस केली असता त्याने तो माल अमोल सुरेश महल्ले (रा. भातकुली) यांचा असल्याचे सांगितले. त्याच्याकडे त्या मालाचे खरेदीबाबत कोणतेही बिल किंवा कागदपत्रे आढळून आले नाही. त्यामुळे तोमाल शासकीय आहे किंवा कसे ? त्याच्या खरेदी बाबतची कागदपत्रे आहे किंवा कसे ? याबाबत पडताळणी करून पुढील कार्यवाहीकरिता तो ट्रक व त्यामधील तांदूळ असा मुद्देमाल वलगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला.