पीडब्ल्यूडीमधून आदिवासींची २९ राखीव पदे गायब; धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:16 IST2025-01-10T14:15:31+5:302025-01-10T14:16:43+5:30
Amravati : अजब-गजब कारभार; अधिसंख्य केले १०९, रिक्त दाखविली ८० पदे

29 reserved posts for tribals missing from PWD; Shocking information revealed
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातून अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेली तब्बल २९ पदे गायब झाली असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून पुढे आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागात गट 'अ' ते 'ड' संवर्गात एकूण मंजूर पदे १४ हजार १८१ आहेत. यापैकी अनुसूचित जमातीसाठी १ हजार ६० पदे राखीव आहेत. अनुसूचित जमातींची भरलेली पदे ८५८ आहेत. २०२ पदांचा पूर्वीचा अनुशेष शिल्लक आहे. जातवैधता प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांची संख्या ७४८ आहे. ११० जणांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १०९ आहे.
असा आहे रिक्त पदांचा समावेश
यात आस्थापना- ३, सेवा १, सेवा २, सेवा ३. प्रशासन ४, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, मुख्य अभियंता (विद्युत) मुंबई, मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) मुंबई, मुख्य वास्तुशास्त्र, संचालक उपवने व उद्याने या १५ विभागातील पदांचा समावेश आहे.
अनुसूचित जमाती पदभरती तपशील
संवर्ग एकूण मंजूर पदे राखीव पदे भरलेली पदे अधिसंख्य पदे
गट-अ ८९० १०७ ८२ १
गट-ब ३०९३ २२२ १९६ १९
गट-क ७१८२ ५१३ ३८२ ५७
गट-ड ३०१६ २१८ १९८ ३२
१४१८१ १०६० ८५८ १०९
"अधिसंख्य पदावर १०९ जणांना वर्ग केल्यानंतर ती पदे रिक्त दाखवायला पाहिजे होती. पण केवळ ८० पदे रिक्त दाखविण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले (सार्वजनिक उपक्रम वगळून), राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी न्याय देऊन अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची विशेष पदभरती मोहीम राबवण्यात यावी."
- मारोती खामकर उपाध्यक्ष, ट्रायबल फोरम पुणे विभाग