मेळघाटात २३४ बालके अतितीव्र कुपोषित; महिला बाल विकास विभागाकडून उपाययोजना
By जितेंद्र दखने | Updated: June 15, 2023 17:43 IST2023-06-15T17:42:51+5:302023-06-15T17:43:36+5:30
कुपोषणास आळा घालण्याचा प्रयत्न

मेळघाटात २३४ बालके अतितीव्र कुपोषित; महिला बाल विकास विभागाकडून उपाययोजना
अमरावती : जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागामार्फत कुपोषण मुक्तीसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत असल्या तरी मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यात २३४ बालके (सॅम) अतितीव्र कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी व कुपोषणास आळा घालण्यासाठी अंगणवाड्यांमार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत. झेडपी सीईओ अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनात मेळघाटातील कुपोषण कमी करण्यासाठी विशेष बाब म्हणून पेसाचा निधीमधून ४ हजार कमी वजनांच्या बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात येत असून त्यामुळे बालके कुपोषित होण्यापासून वाचविण्यासाठी मदत होणार आहे.
बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार दिला जातो. तसेच अंगणवाडीत दर महिन्यांला या बालकांची वजन व उंचीची नोंद घेत त्यांच्या वाढीवर देखरेख ठेवली जाते. यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. विशेष म्हणजे याबाबत सर्व माहिती पोषण ट्रॅकर ॲपद्वारे प्रशासन व शासनामार्फत पोहोचवली जाते. मात्र, असे असताना देखील एप्रिल महिन्यात जिल्ह्यात २३४ बालके अतितीव्र कुपोषित असल्याचे आढळून आले आहेत. अतीतीव्र कुपोषित बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी व कुपोषणास आळा घालण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने तयार केलेल्या विशेष एनर्जी डेन्स न्यूट्रीशियन्स फूड आहाराचा पुरवठा करण्यात येतो.
१२० ग्राम बालविकास केंद्र
अतितीव्र कुपोषित २३४ (सॅम) बालकांना जिल्ह्यात कार्यरत असलेल्या १२० ग्राम बालविकास केंद्रामध्ये दाखल करून घेतले जाते. काही पालकांना पीएचसीमधील बाल उपचार केंद्रात दाखल करून त्यांच्यावरही औषधोउपचार उपचार तसेच पूरक पोषण आहार दिला जात असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे डेप्युटी सीईओ डॉ.कैलास घाेडके यांनी सांगितले.