अमरावती जिल्ह्यात सात महिन्यांच्या कालावधीत नव्याने आढळले २२६ कुष्ठरुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 18:37 IST2025-11-05T18:36:11+5:302025-11-05T18:37:13+5:30
Amravati : हा कुष्ठरोग मायक्रोबॅक्टेरीयम लेप्री या जंतूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून त्वचा, नसा, डोळे आणि इतर अवयवांवर त्याचा परिणाम होतो. या आजाराबद्दल समाजात अजूनही भीती, गैरसमज आणि भेदभाव कायम आहेत.

226 new leprosy patients found in Amravati district in a period of seven months
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सार्वजनिक आरोग्य विभागाने कुष्ठरोगाला 'नोटिफायबल डिसीज' म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे कुष्ठरोगाचे निदान झालेल्या सर्व रुग्णांची नोंद आता दोन आठवड्यांच्या आत संबंधित जिल्हा आरोग्य कार्यालय, सहायक संचालक, आरोग्य सेवा, कुष्ठरोग तसेच स्थानिक नागरी आरोग्य अधिकाऱ्यांकडे करणे आता सर्व डॉक्टर आणि आरोग्य संस्थांसाठी बंधनकारक आहे. जिल्ह्यात एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीमध्ये २२६ नव्या कुष्ठरुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
हा कुष्ठरोग मायक्रोबॅक्टेरीयम लेप्री या जंतूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून त्वचा, नसा, डोळे आणि इतर अवयवांवर त्याचा परिणाम होतो. या आजाराबद्दल समाजात अजूनही भीती, गैरसमज आणि भेदभाव कायम आहेत. या आजाराचे निदान लवकर न झाल्यास आणि उपचारात विलंब झाल्यास रुग्णांमध्ये विकृती निर्माण होते. त्यामुळे वेळेत निदान आणि संपूर्ण औषधोपचार हे कुष्ठरोग नियंत्रणाचे प्रमुख घटक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. आरोग्य विभागाने २०२७ पर्यंत 'कुष्ठरोगाचा शून्य प्रसार' हे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये संसर्गाची साखळी पूर्णपणे तोडणे, प्रसार शून्यावर आणणे, मुलांमधील विकृतीचे प्रमाण शून्य करणे आणि कुष्ठरुग्णांविषयी समाजातील भेदभाव नष्ट करणे आदी बाबींचा समावेश आहे.
१७ नोव्हेंबरपासून शोधमोहीम पंधरवडा
जिल्ह्यात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीमध्ये 'कुष्ठरुग्ण शोध अभियान' राबविण्यात येणार आहे. २०२७ पर्यंत 'शून्य कुष्ठरोग प्रसार' हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आरोग्य विभागाकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे.
३३१ रुग्ण घेताहेत रुग्णालायत उपचार
जिल्ह्यात एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीमध्ये तब्बल २२६ नव्या कुष्ठरुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही ३३१ इतकी झाली आहे. तर एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये तब्बल ३८१ रुग्ण हे उपचारामुळे रोगमुक्त झाल्याची माहितीही कुष्ठरोग विभागाने दिली आहे. विशेष म्हणजे कुष्ठरोगविभागाने याकरीता सातत्याने विविध उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे यात यश मिळाले आहे.
"नागरिकांनी कुष्ठरोगाबाबत भीती बाळगू नये, लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, कारण हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. केवळ वेळेत निदान आणि उपचार आवश्यक आहे. जिल्ह्यात सध्या ३३१ रुग्ण हे उपचाराखाली आहेत."
- डॉ. पूनम मोहोकार, सहायक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) अमरावती