२० हजार लाडक्या बहिणींना केवायसी न करणे भोवले; नोव्हेंबरपासून थकलेले हप्ते केव्हा मिळणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 18:30 IST2026-02-19T18:26:10+5:302026-02-19T18:30:32+5:30
Amravati : गाव पातळीवरील सीएससी व सेतू केंद्रधारकांनी योग्य सहकार्य न केल्यामुळे जिल्ह्यातील २० हजारांवर लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालीच नाही.

20,000 beloved sisters were fooled into not doing KYC; When will the installments due since November be received?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गाव पातळीवरील सीएससी व सेतू केंद्रधारकांनी योग्य सहकार्य न केल्यामुळे जिल्ह्यातील २० हजारांवर लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालीच नाही. त्यामुळे या महिलांचे नोव्हेंबर २०२५ पासूनचे पैसे अडले आहेत. परिणामी, शासनाने आम्हाला पुन्हा एकदा ई-केवायसीची संधी द्यावी, अशी त्यांची मागणी असून, त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांना साकडे घातले आहे.
महिला या मुख्यत्वे ग्रामीण भागातील आहेत. ई-केवायसीसाठी त्या वारंवार सेतू व सीएससी केंद्रांवर जात होत्या. परंतु, कधी सर्व्हर डाऊन तर कधी विजेचा लपंडाव यामुळे ३१ डिसेंबरच्या आत त्यांची ई-केवायसी झाली नाही. बहुतेक महिला म्हणतात की, त्यांनी ई-केवायसीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे गोळा केली होती. काहींनी ती सेतू केंद्रचालकांकडेही सोपविली. परंतु, तरीही त्यांची ई-केवायसी वेळेत पूर्ण झाली नाही. परिणामी, त्यांचा लाभ बंद झाला आहे. शासनाने सध्या ई-केवायसीदरम्यान चुकीची माहिती अपलोड केलेल्या महिलांना पुन्हा दुरुस्तीची संधी दिली आहे. त्यामुळे त्या महिला आगामी ३१ मार्चपर्यंत आवश्यक ती दुरुस्ती करू शकतात. त्याच धर्तीवर आम्हालाही ई-केवायसीची संधी द्यावी, अशी मागणी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी केली आहे.
जिल्ह्यात ७ लाखांवर लाडक्या बहिणींचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. या महिलांना दरमहा दीड हजार रुपयांची रक्कमही मिळत गेली. या काळात शासनाने पडताळणीसाठी सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करायला होती. ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख होती. परंतु, या काही हजारो महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. यासंदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याआधारे जिल्हाधिकारी महोदयांकडे प्रस्ताव पाठविला जाईल असे महिला बालविकारी अधिकारी अतुल भंडागे यांनी सांगितले.