१९ वर्षीय मुलीला किडनीचा त्रास, ४६ वर्षीय आईने दिले जीवनदान

By उज्वल भालेकर | Published: March 24, 2024 09:13 PM2024-03-24T21:13:03+5:302024-03-24T21:15:11+5:30

सुपरमध्ये सर्वात कमी वयातील मुलीची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

19-year-old girl with kidney problem, 46-year-old mother gave her life | १९ वर्षीय मुलीला किडनीचा त्रास, ४६ वर्षीय आईने दिले जीवनदान

१९ वर्षीय मुलीला किडनीचा त्रास, ४६ वर्षीय आईने दिले जीवनदान

अमरावती: तरुण वयातील किडनीचा त्रास असलेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) येथे शुक्रवारी सर्वात कमी वयाची म्हणजेच एका १९ वर्षीय मुलीवर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. आपल्या मुलीला कमी वयात झालेल्या किडनीचा त्रास पाहून ४६ वर्षीय आईने आपली किडनी दान केली आहे.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील रहिवासी असलेल्या सलोनी संतोष चव्हाण (१९) ही मागील सात महिन्यांपासून किडनी आजाराने त्रस्त होती. दोन्ही किडनी निकामी झाल्याने तिच्यावर डायलिसिसवर उपचार सुरू होते. त्यामुळे आपल्या मुलीला होणारा त्रास आणि मुलींच्या भविष्याचा विचार करून त्यावर किडनी प्रत्यारोपण हा योग्य पर्याय असल्याचे आई लता संतोष चव्हाण (४६) यांच्या लक्षात येताच त्यांनी आपली किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.

यावेळी सुपरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफरोलॉजिस्ट डॉ. प्रणित काकडे, डॉ. निखिल बडणेरकर, डॉ. नयन काकडे, युरो सर्जन डॉ. विशाल बाहेकर, डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. राहुल घुले, डॉ. प्रतीक चिरडे, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. रोहित हातगावकर, डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. दीपाली देशमुख, डॉ. जफर अली, डॉ. अंजू दामोदर, डॉ. माधव ढोपरे, किडनी ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर डॉ. सोनाली चौधरी यांनी ही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली. यावेळी परिचारिका अनिता तायडे, नीता कांडलकर, नीलिमा तायडे, लता मोहता, कविता बेरड, अभिषेक नीचत, विजय गवई, सरला राऊत, योगीश्री पडोळे, रेखा विश्वकर्मा, अनिता खोब्रागडे, तेजल बोंडगे, वैभव भुरे, अनु वडे, नितीन मते यांनी सहकार्य केले.

सुपरमध्ये झालेल्या किडनी प्रत्यारोपण रुग्णांमध्ये सलोनी ही सर्वात कमी वयाची रुग्ण आहे. या वयामध्ये बहुदा रोगप्रतिकारक शक्तीच्या आजार व जन्मजात किडनीचे आजार हे किडनी निकामी होण्यासाठी कारणीभूत ठरतात. कमी वयातील मुलांना वारंवार होणारी किडनी स्टोन किंवा संक्रमण असल्यास तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते.- डॉ. प्रणित काकडे, नेफ्रोलॉजिस्ट

Web Title: 19-year-old girl with kidney problem, 46-year-old mother gave her life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.