अमरावती विद्यापीठात बनावट नेट-सेट प्रमाणपत्राद्वारे १९ प्राध्यापकांनी बळकावल्या नोकऱ्या
By गणेश वासनिक | Updated: November 21, 2023 18:06 IST2023-11-21T18:04:14+5:302023-11-21T18:06:22+5:30
दोन प्राध्यापकांच्या प्रमाणपत्राचे व्हेरिफेकशेन पूर्ण, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दणक्यानंतर आता पोलिसात देणार तक्रार

अमरावती विद्यापीठात बनावट नेट-सेट प्रमाणपत्राद्वारे १९ प्राध्यापकांनी बळकावल्या नोकऱ्या
अमरावती : महाविद्यालयात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदासाठी राज्य पात्रता परीक्षा (सेट) अथवा राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) आवश्यक आहे. मात्र, काही जणांनी बनावट नेट-सेट प्रमाणपत्राच्या आधारे सहयोगी प्राध्यापक पदाची नोकरी बळकावल्याची धक्कादायक बाब निर्दशनास आली आहे.
संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठ संलग्न महाविद्यालयात तब्बल १९ प्राध्यापकांचे नेट- सेट प्रमाणपत्र बनावट असल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे पत्र २७ ऑक्टोंबर २०२३ रोजी अमरावती विद्यापीठाला प्राप्त झाले आहे.
माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील कला विज्ञान महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक तथा सहयाेगी प्राध्यापक सुरेंद्र चव्हाण यांनी डिसेंबर २००४ मध्ये टी ४३२६८७ फिजीकल एज्युकेशन नेट विषयाचे प्रमाणपत्र जाेडून नोकरी मिळविली होती. तथापि, चव्हाण यांचे नेट प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार राजभवनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी चौकशी झाली. विद्यापीठाने सुरेंद्र चव्हाण यांच्या नेट प्रमाणपत्राच्या चौकशीबाबतची माहिती युजीसीकडे अहवाल रूपात पाठविला. युजीसीने चव्हाण यांच्या नेट ई- प्रमाणपत्राची पडताळणी ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसे पत्र यूजीसीने अमरावती विद्यापीठाला पाठविले आहे.
यूजीसीच्या पत्रानुसार एका सहयाेगी प्राध्यापकांचे नेट प्रमाणपत्र बनावट असल्याचे कळविण्यात आले आहे. साधारणत: अन्य १६ जणांची यादी आहे. त्यानुसार नेट-सेट प्रमाणपत्राची महाविद्यालयाकडून माहिती मागविली जाणार आहे.
- डॉ. तुषार देशमुख, कुलसचिव, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ