समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:17 IST2025-11-05T12:16:44+5:302025-11-05T12:17:53+5:30
राज्याच्या दळणवळणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या समृद्धी महामार्गावर वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी नागपूरपासून मुंबईपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे.

समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
अमरावती : राज्याच्या दळणवळणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या समृद्धी महामार्गावर वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी नागपूरपासूनमुंबईपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. जवळपास १५०० कॅमेरे समृद्धी महामार्गावर लावण्यात येणार आहेत. नागपूर ते मुंबई समुद्धी महामार्ग गेमचेंजर ठरला असून, ७०१ कि.मी.च्या समृद्धी महामार्गावर आता सुविधा निर्माण करण्यासाठी काम केले आहे.
सध्या समृद्धी महामार्गावर नागपूर ते जालना, शिर्डी, नाशिक व ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या कमालीची वाढली आहे. १२० प्रति किमी तास कार, तर जड वाहनाकरिता ८० किमी प्रति तास वेगमर्यादा दिलेली आहे. हा महामार्ग अत्यंत गुळगुळीत आणि गतिरोधक नसलेला आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. कारण महिन्याला ३ लाख लहान-मोठी वाहने या महामार्गावर धावत असून, माल वाहतूक करणाऱ्या लॉरीज आता या समृद्धी महामार्गाचा उपयोग करताना दिसून येतात.
सीसीटी कॅमेरे लागण्यास सुरुवात
समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या वाहनांचा वेग तपासण्यासाठी नव्हे, तर समृद्धी महामार्गावर अपघात घडल्यास कंट्रोल रूम तत्काळ अपघात स्थळाचे ठिकाण दाखविणार असून, अपघातस्थळी लवकर मदत मिळणार आहे. कारण सध्या अपघात झाल्यावर वाहनधारकांना वाहन नेमके स्थळ सांगताना अडचण होते. कारण मध्ये कोणतेही गाव नसते आणि किमीऐवजी चेनेज यावर स्थळ ठरविले जाते. जे केवळ ‘एमएसआरडी’ला कळते. समृद्धी महामार्गावर नागपूर ते वाशिमदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.
दिल्लीच्या कंपनीला कंत्राट
नागपूर ते मुंबईदरम्यान समृद्धी महामार्गावर एकूण १५०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहे. अत्यंत प्रभावी सीसीटीव्ही कॅमेरे एका बाजूने ५०० मीटर आणि दुसऱ्या बाजूने ५०० मीटर क्षेत्र व्यापणारे हे कॅमेरे बसविण्याचे काम दिल्ली येथील एनसीसी या कंपनीकडे देण्यात आले आहे. उंचावरून ५०० मीटर सरळ आणि २०० मीटर बाजूला नजर ठेवणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात समृद्धीवर कंट्रोल रूम तयार करणार असून, यामध्ये ‘एआय’चा वापर होणार आहे. मुंबई हे प्रमुख कंट्रोल रूम असेल.
आता नजर चुकविता येणार नाही
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे हे अपघात, सुसाट धावणारी वाहने यावर करडी नजर ठेवणार आहे, तसेच समुद्धी महामार्गावर होणारी साहित्याची चोरी पकडणार आहे. सर्व कॅमेरे हे सोलार ऊर्जा सिस्टमवर काम करतील. रात्रीच्या वेळी आरटीओ, पोलिस यांच्या गस्तीचा आढावा घेणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेला सतत गस्त घालावी लागेल.