बेपत्ता वेदांतचा मृतदेह आढळला विहिरीत, परिसरात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 17:28 IST2022-02-05T17:13:58+5:302022-02-05T17:28:00+5:30
२ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झालेल्या वेदांतचा मृतदेह आज सकाळी घराजवळील विहीरीत आढळून आला.

बेपत्ता वेदांतचा मृतदेह आढळला विहिरीत, परिसरात खळबळ
अमरावती : सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव बोर्डी येथील १५ वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह शनिवारी सकाळी घराजवळील शेतातील विहिरीत आढळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. वेदांत सुरेश तट्टे असे मृताचे नाव आहे.
आई-वडिलांचा एकुलता एक असलेला मृत वेदांत हा २ फेब्रुवारीपासून घरातून बेपत्ता झाला होता. त्याच्या पश्चात दोन बहिणी आहेत. तो अचलपूर येथील सिटी हायस्कूलचा दहावीचा विद्यार्थी होता. तो २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अचलपूर येथे गेला होता. तेथून घरी आल्यानंतर दुपारी ३.३० च्या दरम्यान घरून गेला. तेव्हापासून तो बेपत्ता होता. या संदर्भात वडील सुरेश तट्टे यांनी सरमसपुरा पोलिसात तशी फिर्याद दिली होती.
दोन दिवसांपासून परिजनांसह गावकरी, पोलीस त्याचा शोध घेत होते. शनिवारी सकाळी रमेश तट्टे यांच्या विहिरीत ओलितासाठी गेलेल्या मजुराला दुर्गंधी येत असल्याने त्याने डोकावून पाहिले असता, मृतदेह आढळला. ही बाब पोलिसांना सांगितल्यावर तपास केला असता, तो बेपत्ता वेदांतचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. मुलाचा मृतदेह पाहताच आईने एकच हंबरडा फोडला.
घटनास्थळी सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या ठाणेदार सुलभा राऊत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, जमादार संजय उइके, घनश्याम किरोले, संदीप वाघमारे यांनी येत मृतदेह ताब्यात घेतला व अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवला. वेदांत विहिरीपर्यंत कसा गेला, नेमका कुठला प्रकार त्याच्यासोबत घडला, ही आत्महत्या की घातपात, या बाबींचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.