जिल्ह्यातील १५ टक्के पाणी नमुने दूषित
By Admin | Updated: May 5, 2014 00:17 IST2014-05-05T00:17:35+5:302014-05-05T00:17:35+5:30
तापत्या उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत आहे. तर दुसरीकडे हजारो नागरिकांना दूषित पाणी पिऊन तहान भागवावी लागत आहे.

जिल्ह्यातील १५ टक्के पाणी नमुने दूषित
अमरावती : तापत्या उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत आहे. तर दुसरीकडे हजारो नागरिकांना दूषित पाणी पिऊन तहान भागवावी लागत आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पाण्याचे नमुने घेऊन जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत अनुजीव तपासणी केली असता १५ टक्के नमुने दूषित आढळून आले. या अहवालवरुन जिल्हाभरातील बहुतांश भागातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. पाणी हे जीवन आहे. कडाक्याच्या उन्हामुळे जिल्ह्याभरातील जलस्त्रोतांची पातळी घटत चालली आहे. वाढत्या उन्हात पाण्याची गरजही वाढते. शासनाने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाण्याचे कृत्रिम स्त्रोत निर्माण केले आहेत. मात्र, या स्त्रोतांकडेच दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे शहरातील स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शहरातील पाण्याच्या शुध्दतेबद्दलही आता संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील पाणीस्त्रोतांचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात येतात. त्याठिकाणी पाण्याच्या नमुन्यांची अनुजीव तपासणी केली जाते. पाण्यात जिवाणू- विषाणू आहेत काय? हे या तपासणीप्रक्रियेत स्पष्ट होते. १०० मिलीलिटर पाण्याच्या नमुन्याची अनुजीव तपासणी केली जाते. पाण्यात कॉलीफॉम ग्रुप व थर्माटालरन्टचा शोध घेण्यात येतो. महिन्याकाठी जिल्ह्यातील १२०० पाण्याचे नमुने प्रयोगशाळांकडे तपासणीकरिता येतात. मात्र, त्यापैकी १५ टक्के पाणी दूषित असल्याचा अहवाल दर महिन्यात पाहायला मिळत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून हीच स्थिती आहे. तरीही आरोग्य यंत्रणा पाण्याचे स्त्रोत शुध्द करण्यावर भर देत नाही, असे या अहवालावरून स्पष्ट होते. परिणामी दूषित पाण्यामुळे होणारे आजार वाढत चालले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय व खासगी रुग्णालयात आजारी रुग्णांची वाढलेली संख्या बघता दूूषित पाण्यामुळे किती गंभीर परिणामांचा सामना करावा लागू शकतो, हे लक्षात येते. जलस्त्रोतांमधून दूषित पाणी पुरवठा होत असेल तर त्यासाठी संबंधितांनी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आहे.