अमरावती जि.प. व पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेवर १४५ आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 15:31 IST2025-07-30T15:28:38+5:302025-07-30T15:31:52+5:30
चेंडू विभागीय आयुक्तांच्या कोर्टात, ८ ऑगस्टपर्यंत प्रक्रिया : सर्वाधिक ४९ हरकती बुलढाणा जिल्ह्यात

145 objections on the ward structure of Amravati Z.P. and Panchayat Samiti
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेवर पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमधून एकूण १४५ आक्षेप आणि हरकती दाखल झाल्या असून, त्यावरील अंतिम निर्णयाचा चेंडू सध्या विभागीय आयुक्तांच्या कोर्टात आहे. ८ ऑगस्टपर्यंत जिल्हानिहाय सुनावण्या होणार असून, ११ ऑगस्टला अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
२८ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेपांसह आपापले प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केले आहेत. त्यानुसार १८ ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे.
यानंतर आरक्षण सोडत, मतदार यादीतील सुधारणा यांची प्रक्रिया पार पडल्यानंतर सप्टेंबर महिन्यात सार्वत्रिक निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समिती गणासंदर्भात १४ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांनी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली होती. यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गावाचे नाव त्या गणाला व गटाला देण्यात आलेले आहे.
शिवाय ग्रामविकास विभागाने दिलेल्या सूत्रानुसार गटाची निश्चिती करण्यात आली. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ५९, अकोला ५२, वाशिम ५२, बुलढाणा ६१ व यवतमाळ जिल्ह्यात ६२ गट निश्चित करण्यात आलेले आहेत.
जिल्हानिहाय आक्षेप
अमरावती - १८
यवतमाळ - २९
अकोला - ३२
वाशिम - १७
बुलढाणा - ४९
एकूण - १४५
अशा आहेत जिल्हानिहाय सुनावणी
माहितीनुसार २९ ते ३१ जुलै दरम्यान बुलढाणा जिल्हा, १ ऑगस्टला अमरावती जिल्हा, ४ ऑगस्टला वाशिम जिल्हा, ५ व ६ ऑगस्टला अकोला जिल्हा तसेच ७ व ८ ऑगस्टला यवतमाळ जिल्ह्यातील आक्षेप हरकतींवर विभागीय आयुक्त सुनावणी घेतील. त्यानंतर १८ ऑगस्टला प्रभाग रचनेचा प्रस्ताव अंतिम करण्यात येऊन राज्य निवडणूक आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे.