सायकल घेऊन फिरायला गेला... अन् दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेहच मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2022 18:05 IST2022-02-15T17:46:17+5:302022-02-15T18:05:01+5:30
सोमवार सायंकाळपासून तो बेपत्ता होता.

सायकल घेऊन फिरायला गेला... अन् दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेहच मिळाला
अमरावती : नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सौदागरपुरा परिसरातील एका १३ वर्षीय मुलाचा पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ही घटना उघड झाली. मोहम्मद फाजील असे मृत बालकाचे नाव आहे. सोमवार सायंकाळपासून तो बेपत्ता होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मो. फाजील हा काही मित्रांसमवेत भाड्याची सायकल घेऊन फिरायला गेला. लालखडीच्या समोर सुकळीपर्यंत गेल्यानंतर तीन मित्र परत आले व ते काहीही न सांगता आपापल्या घरी परतले. मात्र, दुकान बंद करण्याची वेळ झाल्यानंतरही एक सायकल परत न आल्याने त्या दुकानदाराने मो. फाजीलसोबत सायकल घेऊन गेलेल्या मुलांना त्याबाबत विचारले. त्यादरम्यान तो पाण्यात बुडाल्याची माहिती त्या मुलांनी दिली. मात्र, भीतीपोटी ती बाब आपण कुणालाही सांगितली नसल्याचे ते म्हणाले.
इकडे सौदागरपुरा परिसरात राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांनी देखील त्याचा शोध घेतला. मात्र, सोमवारी रात्री त्याचा शोध लागू शकला नाही. दरम्यान, मंगळवारी सकाळी नागपुरी गेट पोलिसांना देखील घटनेची माहिती देण्यात आली. मंगळवारी सकाळी पाण्याने भरलेल्या एका खड्ड्यातून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.