पाळण्याच्या दोरीला गळफास घेऊन युवा शेतकऱ्याची आत्महत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 19:34 IST2022-01-06T19:31:28+5:302022-01-06T19:34:55+5:30
Young farmer commits suicide : नारायण हरिचंद्र पिंपळकर (३०) या युवा शेतकऱ्याने राहत्या घरात दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली

पाळण्याच्या दोरीला गळफास घेऊन युवा शेतकऱ्याची आत्महत्या!
बार्शिटाकळी : तालुक्यातील सायखेड येथील एका तरुण शेतकऱ्याने आपल्या सहा महिन्यांच्या बाळाच्या पाळण्याच्या दोरीला गळफास घेऊन जीवन यात्रा संपविल्याची घटना सायखेड येथे ५ जानेवारी रोजी सायंकाळी घडली. या घटनेमुळे समाजमन गहिवरले असून, सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नारायण हरिचंद्र पिंपळकर (३०) या युवा शेतकऱ्याने राहत्या घरात दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शेतकऱ्याची पत्नी व नातेवाईकांना कळताच त्यांनी आरडाओरड केली. परंतु त्यांना वाचविण्यात यश आले नाही. याबाबतची माहिती पोलीस पाटील यांना देण्यात आली. मृताचा भाऊ दिनेश पिंपळकर यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून बार्शीटाकळी पोलीस रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. मृत शेतकऱ्यावर ६ जानेवारी रोजी शोकाकुल वातावरणात सायखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नारायण पिंपळकर यांच्या पश्चात आई, भाऊ, बहिणी, पत्नी, ५ वर्षांची मुलगी व सहा महिन्यांचा चिमुकला आहे.