पिवळा पळस फुलला!

By Admin | Updated: March 13, 2016 02:01 IST2016-03-13T02:01:23+5:302016-03-13T02:01:23+5:30

खामगाव तालुक्यात आढळला दुर्मिळ पिवळा पळस; अल्बिनिझमचा प्रकार असल्याची तज्ज्ञांची माहिती.

Yellow blossom blossomed! | पिवळा पळस फुलला!

पिवळा पळस फुलला!

अनिल गवई/खामगाव
होळी जवळ आली की हमखास आठवण होते ती पळस फुलांची. भर उन्हात सगळी सृष्टी ओसाड पडू लागली असताना आपण रस्त्याने जाताना दूरवर नजर टाकली तर आपल्याला एक झाड फुलले दिसते. केशरी रंगाची भरगच्च फुले लागलेली ही झाडे असतात पळसाची. केसरी पळस सगळ्यांच्याच परिचयाचा आहे; मात्र खामगाव तालुक्यातील गणेशपूर येथे दुर्मीळ असा पिवळा पळस आढळून आला आहे.
खामगावपासून जवळच असलेल्या गणेशपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामागे कोकरे यांच्या शेतात पिवळ्या रंगाची फुले लागलेले पळसाचे झाड आढळले. खामगावमधील पर्यावरण मित्र संजय गुरव यांना हे पळसाचे झाड दिसले. त्यांनी याबाबतची माहिती सामाजिक वनीकरण विभागाला कळविली आहे.
पिवळा पळस हा अत्यंत दुर्मीळ समजला जातो. औषधीसाठी या फुलांचा उपयोग केला जातो. पिवळ्या पळसाबद्दल अंधश्रद्धादेखील आहे. गुप्तधन शोधण्यासाठी या फुलांचा उपयोग केला जातो. त्यामुळेच जादूटोणा करणार्‍यांना नेहमीच या झाडाची ओढ असते. ही जरी अंधश्रद्धा असली तरी या झाडाचे आकर्षण सगळ्यांनाच आहे.
पिवळ्या पळसाबद्दल वनस्पती शास्त्रज्ञांचे असे मत आहे की हा सगळा अल्बिनिझमचा प्रकार आहे. यामध्ये वनस्पतीतील रंगद्रव्यात बदल होतो. ऐरवी केशरी-भगव्या रंगाचे आढळणारे पळस पिवळ्या रंगाचे आढळणे हा अलगिलिझमचाच प्रकार आहे. अतिशय दुर्मीळ असणार्‍या या पिवळ्या पळसाचे संवर्धन व संरक्षण होणे आवश्यक आहे. पिवळ्या पळसाच्या वृक्षांचे रोपण व्हावे यासाठी सहा वर्षांपूर्वी याच्या बिया रोपण करून त्या उगविण्याचा प्रयत्न झाला; परंतु बिया उगविल्या नाहीत, असे गुरव यांनी सांगितले.

Web Title: Yellow blossom blossomed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.