अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा का झाली नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:17 IST2021-05-15T04:17:47+5:302021-05-15T04:17:47+5:30
अकोला : जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ...

अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा का झाली नाही?
अकोला : जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम अद्याप का जमा करण्यात आली नाही? अशी विचारणा जिल्हा परिषद अर्थ समितीच्या सभेत सदस्यांनी केली.
ऑनलाइन पद्धतीने जिल्हा परिषद अर्थ समितीची सभा घेण्यात आली. जिल्हा परिषद कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम अद्याप का जमा जमा करण्यात आली नाही? संबंधित लाभार्थ्यांना अनुदानाच्या रकमेचा केव्हा लाभ मिळणार? अशी विचारणा समिती सदस्य पुष्पा इंगळे व विनोद देशमुख यांनी कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. येत्या सोमवारपर्यंत संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभेत सांगितले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती सावित्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेत समितीचे सदस्य व संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.
लसीकरणाचे योग्य नियोजन करा
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असून, लसीकरणासाठी गर्दी होत असल्याने, योग्य पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा परिषद आरोग्य विभागाला सभेत देण्यात आले.
२५ कोटींच्या निधी खर्चाचे
नियोजन काय?
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास योजनेंतर्गत प्राप्त २५ कोटी रुपयांच्या निधी खर्चाचे नियोजन काय? अशी विचारणा जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाला सभेत करण्यात आली. तसेच पंधराव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीतून विकासकामांच्या नियोजनासंदर्भातही सभेत विचारणा करण्यात आली.
समाधानकारक उत्तर न देणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘शो-कॉज’ बजावणार!
अर्थ समितीच्या सभेला गैरहजर तसेच समाधानकारक उत्तर न देणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा (शो-कॉज) नोटीस बजावण्याचे निर्देश सभेत देण्यात आले.