वऱ्हाडातील जलसाठ्यात तीन महिन्यांत २७ टक्के घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 13:40 IST2019-01-13T13:39:53+5:302019-01-13T13:40:08+5:30
अकोला : अमरावती विभागातील ५०२ सिंचन प्रकल्पांत आजमितीस केवळ ३६.३३ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. तीन महिन्यांत या साठ्यात २७.१५ टक्क्यांवर घट झाली आहे.

वऱ्हाडातील जलसाठ्यात तीन महिन्यांत २७ टक्के घट
अकोला : अमरावती विभागातील ५०२ सिंचन प्रकल्पांत आजमितीस केवळ ३६.३३ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. तीन महिन्यांत या साठ्यात २७.१५ टक्क्यांवर घट झाली आहे. यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात अल्प पाऊस झाल्याने येथील धरणातील जलसाठा बुडाला टेकल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत ९ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये ११ जानेवारीपर्यंत ३६.३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा आॅक्टोबरमध्ये ६३.४८ टक्के होता. म्हणजेच तीन महिन्यांत २७.१५ टक्के जलसाठा घटला आहे. २०१९ मधील जानेवारी महिना लागताच यात वेगाने घट सुरू झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा शून्य टक्केच आहे. बुलडाणा जिल्ह्यातीलच कोराडी व मस मध्यम धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. तोरणा ७.८६, तर उतावळी धरणातील पातळी ३४.९२ टक्के असून, नळगंगा या मोठ्या धरणात १२.९४ टक्के, पेनटाकळी धरणात ६.०९ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १५.७३ टक्के, पलढगमध्ये २२.२४ टक्के, मन धरणात २१.१२ टक्के, तर मसमध्ये शून्य टक्के आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ७४.११ टक्के जलसाठा आहे.
अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ७२.७८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ६२.९८ टक्के जलसाठा असून, उमा ८६.८०, मोर्णा धरणात ३३.८८ टक्के जलसाठा आहे.