Water crisis t on Akola; 6.06 percent water storage in Katepurna Dam | अकोलेकरांवर जलसंकटाचे सावट; महान धरणात 6.06 टक्के जलसाठा 

अकोलेकरांवर जलसंकटाचे सावट; महान धरणात 6.06 टक्के जलसाठा 

- आशिष गावंडे
अकोला: निम्मा पावसाळा उलटून गेल्यानंतरही शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान (काटेपूर्णा प्रकल्प) धरणात अवघा 6.06 टक्के जलसाठा उपलब्ध असल्याची विदारक परिस्थिती आहे. त्यामुळे आगामी दीड महिन्यांत वाशिम जिल्ह्यात नेमका किती पाऊस बरसतो, यावरच महान धरण आणि अकोलेकरांना होणाºया पाणी पुरवठ्याचे भवितव्य अवलंबून आहे. या सर्व ‘जर-तर’ अशा शक्यता असल्या तरीही भविष्यात शहरावर जलसंकट ओढवल्यास सद्यस्थितीत महापालिका प्रशासनाकडे कोणताही ठोस आराखडा तयार नाही. प्रशासन तर सोडाच, खुद्द सत्ताधारी भाजपचेही या गंभीर विषयाकडे होणारे दुर्लक्ष शहरवासीयांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
अकोला शहराला काटेपूर्णा प्रकल्पातून (महान धरण) पाणी पुरवठा केला जातो. शहरवासीयांसाठी या धरणातून वर्षाकाठी २४ दलघमी जलसाठ्याची उचल करता येते. उर्वरित जलसाठा सिंचन व औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांसाठी आरक्षित आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी अद्याप काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात उण्यापुºया दीड टक्के जलसाठ्याची भर पडल्याचे समोर आले आहे. वाशिम आणि मालेगाव परिसरात दमदार पाऊस पडल्यास काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होते; परंतु यंदा वाशिम जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस न झाल्यामुळे या प्रकल्पात पुरेसा जलसाठा जमा झाला नसल्याची परिस्थिती आहे. आज रोजी या प्रकल्पात केवळ ५.५५ टक्के एवढा अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून, यामधून अकोलेकरांना दोन ते अडीच महिन्यांपर्यंत पाणी पुरवठा करणे मनपाला शक्य होईल. अकोला व वाशिम जिल्ह्यात पावसाची एकूणच चिन्हे लक्षात घेता पावसाळ्यातील आगामी दीड महिन्यांच्या कालावधीत महान धरणाच्या जलसाठ्यात कितपत वाढ होईल, यावर शंका निर्माण झाली आहे. निश्चितच शहरावरील संभाव्य जलसंकटाचा सामना करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून ठोस नियोजनाची गरज असताना त्यामध्ये अभाव असल्याचे समोर आले आहे.

२००४ मधील ‘हायड्रंट’ निरुपयोगी
२००४-०५ मध्ये शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मनपाने महान ते अकोलापर्यंत असलेल्या मुख्य जलवाहिनीच्या बाजूला सुमारे १०४ ‘हायड्रंट’ निर्माण केले होते. आज रोजी सदर हायड्रंट निरुपयोगी झाले आहेत. शिवाय, त्यामधून पाण्याचा उपसा करून मुख्य जलवाहिनीद्वारे शहरापर्यंत आणणे शक्य नसल्याचा तांत्रिक मुद्दा जलप्रदाय विभागाने उपस्थित केला आहे.


...तर जलसंकटाचे सावट
वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव आदी भागात ‘धो धो’ पाऊस झाल्यानंतरच महान धरणात जलसंचय होतो. गतवर्षी पावसाळ्यात ऐन अखेरच्या टप्प्यात वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली होती. यंदा वाशिम जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यास अकोलेकरांना जलसंकटाचा सामना करावा लागेल.


सत्ताधारी बघ्याच्या भूमिकेत!
आज रोजी अकोलेकरांना दर सातव्या दिवशी पाणी पुरवठा केला जात आहे. धरणातील उपलब्ध जलसाठा व पावसाचा लहरीपणा ध्यानात घेता भविष्यातील संभाव्य जलसंकटावर मात करण्यासाठी सत्ताधारी भाजपने तातडीने जलप्रदाय विभागासोबत बैठकीचे आयोजन करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात सत्ताधारी बघ्याच्या भूमिकेत दिसून येत आहेत.

महान धरणातील जलसाठ्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. सप्टेंबर महिन्यात पावसाची अपेक्षा करायला हरकत नाही. तत्पूर्वी संभाव्य उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिल्या जातील.
-विजय अग्रवाल, महापौर.

 

Web Title: Water crisis t on Akola; 6.06 percent water storage in Katepurna Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.