झोपेत असताना अंगावर कोसळली भिंत; वृद्धेचा मृत्यू, मूर्तिजापूर तालुक्यातील नवसाळ येथील घटना
By रवी दामोदर | Updated: July 10, 2023 13:23 IST2023-07-10T13:23:06+5:302023-07-10T13:23:42+5:30
रात्री आलेल्या पावसामुळे घराची वीट, मातीची भिंत अतिशय जीर्ण असल्यामुळे ती लिलाबाई यांच्या अंगावर पडली.

झोपेत असताना अंगावर कोसळली भिंत; वृद्धेचा मृत्यू, मूर्तिजापूर तालुक्यातील नवसाळ येथील घटना
अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील नवसाळ येथे गाढ झोपेत असलेल्या ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या अंगावर राहत्या घराची भिंत कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली.
नवसाळ येथील लिलाबाई जानराव रोकडे (७५) रा.नवसाळ ही वृद्ध महिला घरात गाढ झोपेत असताना, रात्री आलेल्या पावसामुळे घराची वीट, मातीची भिंत अतिशय जीर्ण असल्यामुळे ती लिलाबाई यांच्या अंगावर पडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी सकाळी त्यांना भिंतीखाली दबलेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आले, परंतु महिला मृत पावलेली नागरिकांना दिसली. यावरून नागरिकांनी माना पोलिस स्टेशनला फोन करून माहिती सांगितली. यावेळी माना पोलिस स्टेशनचे ठाणेदार सूरज सुरोशे व सहकारी पो.कॉ.राजेश डोंगरे, आकाश काळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार सूरज सुरोशे यांचे मार्गदर्शनाखाली तेजराव तायडे हे करीत आहे.