शाळांमध्ये रंगली मतदार जागृती रंगभरण स्पर्धा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 14:32 IST2019-10-20T14:32:17+5:302019-10-20T14:32:24+5:30
हजारो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन चित्रांमध्ये रंग भरले आणि मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

शाळांमध्ये रंगली मतदार जागृती रंगभरण स्पर्धा!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्हा निवडणूक अधिकारी व शिक्षण विभागाच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मतदार जागृती रंगभरण स्पर्धा शनिवारी शाळांमध्येच घेण्यात आली. लालबहादूर शास्त्री क्रीडांगणावर आयोजित स्पर्धा ही पावसामुळे रद्द करून शाळा-शाळांमध्ये घेण्यात आली. हजारो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन चित्रांमध्ये रंग भरले आणि मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शंभर टक्के मतदान व्हावे. विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि कुटुंबामध्ये मतदान करण्याविषयी आग्रह धरावा. यासाठी ही रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. शहरातील मोठी उमरीतील डवले पब्लिक स्कूल, प्रभात किड्स स्कूल, भारत विद्यालय, महाराष्ट्र माध्यमिक शाळा, बालशिवाजी शाळा, जागृती विद्यालय, डॉ. हेडगेवार माध्यमिक शाळा, स्कूल आॅफ स्कॉलर्स, समता विद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय, न्यू इंग्लिश हायस्कूल, जिजाऊ कन्या शाळा, ज्युबिली हायस्कूल, होलीक्रॉस कॉन्व्हेंट, समर्थ पब्लिक स्कूल, सर्वोदय विद्यालय, शिवाजी हायस्कूल, मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालय, प्राजक्ता कन्या विद्यालय, नोएल कॉन्व्हेंट आदी शाळांमधील विद्यार्थ्यांनी रंगभरण स्पर्धेत सहभाग घेतला.
कलाध्यापक संघाच्यावतीने उपलब्ध करण्यात आलेल्या चित्रांमध्ये विद्यार्थ्यांनी रंग भरले. रंगभरण स्पर्धेदरम्यान शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद, उपशिक्षणाधिकारी प्रकाश अंधारे, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, देवेंद्र अवचार यांच्यासह निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी दिल्या. (प्रतिनिधी)