पोलीस असल्याची बतावणी करून ग्रामस्थांना मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 10:41 IST2020-04-15T10:41:46+5:302020-04-15T10:41:57+5:30
अज्जू ठाकूर याच्यासह त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

पोलीस असल्याची बतावणी करून ग्रामस्थांना मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव मंजू : धोतर्डी, सांगळूद परिसरात गत काही दिवसांपासून संचारबंदीचा लाभ उठवित गुंडांची एक टोळी फिरत असून, या टोळीने परिसरात धुमाकूळ घातला आहे. पोलीस असल्याची बतावणी करीत, ग्रामस्थ, लहान मुलांना विनाकारण मारहाण, दमदाटी करीत असल्याच्या तक्रारी होत आहेत. या गुंडांच्या टोळीविरुद्ध बोरगाव मंजू पोलिसांनी कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्यासह ग्रामस्थांनी बोरगाव मंजूच्या ठाणेदारांकडे मंगळवारी केली आहे. त्यानुसार बोरगाव मंजू पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी आरोपी अज्जू ठाकूर याच्यासह त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
सांगळूद येथील आकाश वाघपांजर यांच्या तक्रारीनुसार कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचा लाभ काही गुंड प्रवृत्तीचे युवक घेत आहेत. पोलीस असल्याचे भासवून धोतर्डी, सांगळूद भागातील ग्रामस्थांना, युवकांना मारहाण करून दमदाटी करीत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. एमएच ३0 बीई ७२५७ क्रमांकाच्या दुचाकीवर काही गुंड प्रवृत्तीचे युवक दररोज रात्री १0 ते ११ वाजताच्या सुमारास येऊन निरपराध लोकांना अश्लील शिवीगाळ करून काठीने बेदम मारहाण करीत आहेत. पोलीस असल्याची बतावणी करून ते रात्री घरांमध्ये घुसून ग्रामस्थांना मारहाण करतात. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अखेर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी गुंड प्रवृत्तीच्या अज्जू ठाकूर याच्यासह त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध भादंवि कलम १७0, १७१, ४५२, ३२४, ४१९, ५0४ (३४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)