विधी महाविद्यालय प्रवेशाकडे विद्यार्थ्यांंनी फिरविली पाठ!
By Admin | Updated: October 13, 2016 02:55 IST2016-10-13T02:55:49+5:302016-10-13T02:55:49+5:30
अमरावती विभागातील परिस्थिती; बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांचा फटका.

विधी महाविद्यालय प्रवेशाकडे विद्यार्थ्यांंनी फिरविली पाठ!
अकोला, दि. १२- बार कौन्सिल ऑफ इंडिया व राज्य शासनाच्या आठमुठे धोरणामुळे विधी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांंनी अक्षरश: पाठ फिरविली आहे. तीन आणि पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाला विद्यार्थी प्रवेशच घेत नसल्याची परिस्थिती अमरावती विभागातील ११ महाविद्यालयांमध्ये दिसून येत आहे. तीन वर्षीय अभ्यासक्रमाला केवळ ४५ टक्के विद्यार्थ्यांंनी प्रवेश घेतला आहे, तर पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाला केवळ २२ टक्के विद्यार्थ्यांंनी प्रवेश घेतल्याची बाब समोर आली आहे. 
विधी अभ्यासक्रमासाठी यावर्षी प्रथमच राज्य शासनाने सीईटी घेतली. त्यामुळे विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली. त्यात बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांमुळे विद्यार्थ्यांंमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ऑगस्ट महिन्यात विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आटोपते; परंतु यावर्षी २१ सप्टेंबरपासून विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश फेरीसाठीची प्रक्रिया सुरू झाली. प्रवेश प्रक्रिया लांबल्यामुळे आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या जाचक अटींमुळे विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणार्या हजारो विद्यार्थ्यांंंनी पाठ फिरविली तर शेकडो विद्यार्थ्यांंनी सीईटीच्या निर्णयामुळे मध्य प्रदेशातील विधी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला. एवढेच नाही, तर बार कौन्सिल ऑफ इंडियाने अनेक जाचक अटी लादून अनेक महाविद्यालयांची मान्यतासुद्धा काढून घेतली आणि लाखो रुपयांचे मान्यता शुल्क भरल्याशिवाय विधी महाविद्यालयांना मान्यता देणार नसल्याची भूमिका बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांंंमध्ये संभ्रम निर्माण झाला. ऐनवेळेवर सीईटी परीक्षेचा निर्णय घेतल्याने, विद्यार्थी गोंधळात पडले. सीईटीची तयारी केली नसल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांंंनी सीईटी परीक्षाच दिली नाही. बारावी परीक्षेत प्राविण्यश्रेणीचे गुण मिळवून विद्यार्थ्यांंंना प्रवेश नाकारण्यात आला. विशेष म्हणजे सीईटीमध्ये शुन्य गुण मिळणार्या विद्यार्थ्यांंंना मात्र विधी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याची भूमिका बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतल्यानंतरही विद्यार्थ्यांंंनी विधी अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविली, त्यामुळे अमरावती विभागातील अकराही विधी महाविद्यालयांमधील हजारो जागा रिक्त आहेत. 
अमरावती विभागातील जागा व प्रवेशाची परिस्थिती
जिल्हा               जागा              प्रवेश
अमरावती           ३६0(३ वर्ष)      १८६
                         २४0(५ वर्ष)     ११२
अकोला               ३00(३ वर्ष)     १८0
                         १२0(५ वर्ष)      ३१
बुलडाणा             १२0(३ वर्ष)       ८२
                         १२0(५ वर्ष)       ४७ 
यवतमाळ           १८0(३ वर्ष)      १२३
                        १८0(५ वर्ष)        ८९
वाशिम                 ६0(३ वर्ष)       ४२
                          ६0(५ वर्ष)        २१
.......................................................
                            १६२0            ९१३
७0७ जागा रिक्त 
अमरावती विभागातील ११ महाविद्यालयांमध्ये तीन वर्षीय व पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या १६२0 जागा आहेत. यापैकी ९१३ विद्यार्थ्यांंंनी या दोन्ही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. यंदा विधी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांंंनी पाठ फिरविल्यामुळे अनेक विधी महाविद्यालयांमधील ७0७ जागा रिक्त राहणार आहेत. 
--शासनाने अचानक सीईटी परीक्षा घेतली. त्यामुळे हजारो विद्यार्थी सीईटीची तयारी करू शकले नाहीत. प्रवेश प्रक्रिया लांबली. हजारो विद्यार्थी विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत; परंतु सीईटीमुळे त्यांना पर्याय शोधावा लागत आहे. शासनाने सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांंंना प्रवेश द्यायला हवा. 
रत्ना चांडक, प्राचार्य
अकोला विधी महाविद्यालय.