बाभूळगाव जहाँगीर : शेतकर्यांकडून अधिग्रहीत क रून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधन कार्यासाठी राखीव ठेवण्यात आलेली जागा अनेक वर्षांपासून पडीक असून, सद्यस्थितीत या जागेचा वापर प्रात:विधीसाठी होत असल्याचे दिसत आहे. डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठातील संशोधन कार्यासाठी शासनाने बाभूळगाव जहाँगीर परिसरातील शेतकर्यांकडून अतिशय अल्प मोबदल्यात शेकडो एकर जमीन अधिग्रहित केली. ही जागा संशोधन कार्यासाठी राखीव होती; परंतु विद्यापीठातील संशोधकांकडून त्या जागेचा वापर कोणत्याही संशोधनासाठी करण्यात आला नाही. त्यामुळे ही शेकडो एकर जमीन अनेक वर्षांपासून पडीत पडली आहे. ज्या शेतकर्यांनी आपली जमीन पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या संशोधन कार्यासाठी दिली, ते आज भूमिहीन झाले असून, त्यांच्या जागेचा वापरही संशोधनासाठी करण्यात येत असल्याचे दिसत नाही. शेतकर्यांकडून कवडी मोल भावाने जमीन घेऊन त्यांना भूमिहीन करणार्या शासनाकडून त्या जमिनीचा वापर करण्यात येत नसून, बाभूळगाव जहाँगीर परिसरातील ग्रामस्थ त्या जागेचा वापर प्रात:विधीसाठी करीत असल्याचे दिसत आहे. शेतकर्यांकडून घेण्यात आलेल्या जमिनीचा वापर नियोजित कार्यासाठी होत नसेल, तर शासनाने ती जमीन शेतकर्यांना परत करून त्यांच्या उत्पादनाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या संशोधन कार्यासाठी जमीन देणार्या शेतकर्यांसह परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती घेण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरु आणि डायरेक्टर ऑफ रिसर्च यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु होऊ शकला नाही.