कोळशाच्या राखेचा वापर आता शेतात!
By Admin | Updated: December 10, 2014 00:08 IST2014-12-10T00:08:42+5:302014-12-10T00:08:42+5:30
राज्यातील औष्णिक केंद्राची राख उपलब्ध; शेतक-यांना प्रशिक्षण.

कोळशाच्या राखेचा वापर आता शेतात!
रजरत्न सिरसाट/अकोला
राखेचा वापर केल्याने शेतमाल उत्पादनात २५ टक्के वाढ झाल्याचे एका संशोधनाअंती निष्पन्न झाल्याने मुख्यत्वे कोरडवाहू शेतात या राखेचा वापर करण्यात येणार आहे. ही राख मिळविण्यासाठी राज्यातील सात औष्णिक वीज निर्मिती केंद्रांसोबत नव्याने करार करण्यात येत असून, शेतात राख वापरण्याबाबत दिल्ली येथील ह्यफ्लाय अँश रिसर्च अँन्ड मॅनेजमेंटह्णच्यावतीने शेतकर्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
देशातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रांतून दरवर्षी २३00 लाख टन राखेची निर्मिती होते. त्यापैकी प्रत्यक्षात १३00 लाख टन राखेचाच वापर विटा, सिमेंट, टाईल्ससह विविध बाबींसाठी केला जातो; या राखेचा शेतात वापर करण्यासाठीचे संशोधन दिल्ली येथील सेंटर फॉर फ्लॉय अँश रिसर्च अँन्ड मॅनेजमेंटच्या संशोधकांनी केले असून, या राखेत शेतीची सकसता वाढविण्यासाठी उपयोगी पडणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, अन्नद्रव्ये, सूक्ष्मअन्नद्रव्य, जिप्सम आदी अनेक घटक आढळून आले आहेत. याशिवाय तीन प्रकारची खनिजेही या राखेतून मिळतात. त्यामुळे या राखेचा वापर शेतात करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या राखेचा वापर शेतात करता यावा, यासाठी दिल्लीच्या या संशोधन संस्थेकडून देशासह महाराष्ट्रातील खापरखेडा, कोराडी, चंद्रपूर, भुसावळ दीपनगर, पारस, परळी, नाशिक एकलारा या औष्णिक वीज निर्मिती केंद्रांसोबत शेतीला राख उपलब्ध करू न देण्यासंबंधी नव्याने करार करण्यात येणार आहे. या राखेच्या वापरामुळे सोयाबीनचे उत्पादनात २५ टक्के वाढ होत असल्याचे निदर्शनात आले असून, कापूस, फळ व भाजीपाला व इतर खरीप व रब्बी पिकांच्या उत्पादनात १0 ते १५ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यासाठी संशोधन संस्थेच्यावतीने शेतकर्यांना या औष्णिक वीज निर्मिती केंद्रावर नेऊन प्रशिक्षण दिले जात आहे.
या राखेमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असल्याने कोरडवाहू प्रक्षेत्रावर ही राख वापरण्यासाठीची शिफारस या संशोधन केंद्राने केली आहे. ही राख शेतात वापरल्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नसून, शेत मऊ ठेवण्यास ती उपयोगी पडते. त्यामुळे औष्णिक केंद्रांचा राख साठवणुकीचा प्रश्नही निकाली निघणार आहे.
औष्णिक वीज केंद्रातील राख शेतात वापरल्याने उत्पादनात वाढ झाली असून, ही राख कोरडवाहू क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त आहे. उत्पादन वाढल्याने शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यास मदत होऊ शकते. परंतु राख वाहून नेण्यासाठी शासनाने शेतकर्यांना मदत करण्याची गरज असल्याचे सेंटर फॉर फ्लाय अँश रिसर्च अँन्ड मॅनेजमेंट, नवी दिल्लीचे डॉ. विमल कुमार यांनी स्पष्ट केले.
*अल्पभूधारक शेतकर्यांना मदतीची गरज
राज्यात अल्पभूधारक शेतकर्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या शेतकर्यांना औष्णिक वीज केंद्रातील राख वाहून नेण्याचा खर्च परवडत नसल्याने शासनाने ही राख वाहून नेण्यासाठी शेतकर्यांना अनुदान देण्याची गरज आहे.