अकोटात दगडफेक; तणावपूर्ण शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:28 IST2017-11-10T01:23:49+5:302017-11-10T01:28:07+5:30
अकोट : अकोट शहरातील पानअटाई ते घसेटीपुरा या भागात ९ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास काही युवकांमध्ये वादविवाद होऊन दगडफेकीची घटना घडली.

अकोटात दगडफेक; तणावपूर्ण शांतता
अकोट : अकोट शहरातील पानअटाई ते घसेटीपुरा या भागात ९ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास काही युवकांमध्ये वादविवाद होऊन दगडफेकीची घटना घडली. या घटनेमुळे दंगलीची अफवा पसरल्याने पळापळ होऊन शहरातील बाजारपेठ बंद झाली होती. घटनास्थळावर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्यासह पोलीस ताफा पोहोचला आहे.या दगडफेक प्रकरणी १0 जणांना रात्री उशीरा अटक करण्यात आली.
घसेटीपुरा व डोहोरपुरा परिसरातील काही युवकांमध्ये गुरुवारी रात्री ८ वाजता क्षुल्लक कारणावरून वादविवाद झाल्याचे बोलले जात आहे. या वादविवादातून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेबाबत शहरात मात्र दंगल सुरू झाल्याची अफवा पसरल्यामुळे पळापळ झाली. अवघ्या काही मिनिटांत अकोट शहरातील बाजारपेठ बंद झाली. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी तातडीने पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठले; परंतु दरम्यानच्या काळात क्षुल्लक कारणावरून दगडफेक करणारे युवक घटनास्थळावरून पसार झाले होते. घटनास्थळावर प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी गावीत, एलसीबी प्रमुख कैलास नागरे, अकोट ग्रामीण पोलीस निरीक्षक मिलिंद बहाकर यांच्यासह हिवरखेड, दहीहांडा येथील अतिरिक्त पोलीस ताफा पोहोचला होता. घसेटीपुरा व पानअटाई यादरम्यान झालेल्या दगडफेकीचे लोण पसरू नये म्हणून पोलिसांनी सर्वत्र बंदोबस्त लावला असून, शहरात सद्यस्थितीत शांतता आहे.
अफवांना आळा कधी बसणार?
अकोट शहरात सतत उलटसुलट अफवा उठविल्या जातात. दोघांमध्ये आपसात वादविवाद जरी झाला, तरी सार्वत्रिकपणे जा तीय स्वरूप देऊन अफवा पसरविल्या जातात. त्यामुळे व्यापारी व नागरिकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतो, तसेच शहराच्या शांततेला गालबोट लागून बाजारपेठ बंद होऊन पळा पळ होते. अशा स्थितीत शहरवासीयांनी सामंजस्य राखून अफवांना बळी न पडता शहरात शांतता ठेवणे गरजेचे आहे, तर दुसरीकडे पोलिसांनी अफवा पसरविणार्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे बोलल्या जात आहे.
हा प्रकार क्षुल्लक कारणावरून घडला असावा. घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलिसांना सहकार्य करावे.
- विजयकांत सागर,
अपर जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोला.