इव्हीएम असेपर्यंत लोकसभा निवडणूक जिंकणे अशक्य - प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 19:11 IST2019-12-11T19:11:38+5:302019-12-11T19:11:44+5:30
अकोला : इव्हीएमचा खेळ काँगे्रसच्या काळापासून सुरू आहे. काँग्रेसने मशिनचा वापर उमेदवारांना पाडण्यासाठी केला तर आता भाजप उमेदवारांना निवडून ...

इव्हीएम असेपर्यंत लोकसभा निवडणूक जिंकणे अशक्य - प्रकाश आंबेडकर
अकोला : इव्हीएमचा खेळ काँगे्रसच्या काळापासून सुरू आहे. काँग्रेसने मशिनचा वापर उमेदवारांना पाडण्यासाठी केला तर आता भाजप उमेदवारांना निवडून आणण्यासाठी करीत आहे. राज्याच्या विधानसभा निवडणूकीतही इव्हीएम मॅनेज केल्या होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल पाहावयास मिळाले. मतदान प्रक्रीयेत इव्हीएम असेपर्यंत आपण लोकसभा निवडणूक जिंकू शकत नाही, असेही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा मेळावात सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी लुटारूंची टोळी असते तशी सत्ताधारांची टोळी आहे. सद्यस्थितीत मोदी आणि इतरांनी ठरवून चाललेला खेळ आहे. मनमोहन सिंग यांच्या काळातील लूट पद्धतशिरपणे होती तर भाजपचे सरकार भुरटे चोर असल्याचा टोलाही त्यांनी येथे लगावला. दोन्ही पक्षांच्या संघटीत टोळी सोबत वंचित बहुजन आघाडीला लढायचे आहे. मतदानात व मोजणीत फरक तसेच इव्हीएमसंदर्भात अकोला जिल्हाधिकारी यांचे पत्र आहे. मात्र, त्यावरही काहीच झाले नसल्याचेही ते म्हणाले. सत्ताधारी चोरांच्या विरोधात लढत आहोत. त्यामुळे भाजपसोबत जायचे ठरविले तरी ते घेणार नाहीत. कारण वंचित बहुजन आघाडीचे ध्येयधोरण कोणते आहे, याची चांगलीच जाणीव त्यांना असल्याने आपल्याला स्वीकारले जात नाही, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले. हैद्राबादचे डॉक्टर जळीत प्रकरण वेगळे आहे, अनेक गैरप्रकारांची तक्रार तिने केली होती. त्यामुळे या देशात आमच्या विरोधात जाल तर जिवंत राहू शकत नाही, हा प्रकार देशात सुरू झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. अकोला, वाशिम, धुळे, नंदूरबार, नागपूर जिल्हा परिषदांची निवडणूक स्वबळावर लढवू, त्यामध्ये मोठ्या संख्येने उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.