इंग्रजी, सेमी इंग्रजी सोडून दोन हजारावर विद्यार्थी मातृभाषेकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 01:25 PM2019-07-09T13:25:14+5:302019-07-09T13:25:45+5:30

इंग्रजी विषयाचे वाढते आकर्षण आणि प्रस्थ वाढलेले असताना, विद्यार्थी मराठी माध्यमामध्ये प्रवेश घेत आहेत.

Two thousand students leaving English, Semi English school and join marathi school | इंग्रजी, सेमी इंग्रजी सोडून दोन हजारावर विद्यार्थी मातृभाषेकडे!

इंग्रजी, सेमी इंग्रजी सोडून दोन हजारावर विद्यार्थी मातृभाषेकडे!

Next

- नितीन गव्हाळे

अकोला: गत वर्षभरामध्ये इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यम सोडून विद्यार्थी पुन्हा मराठी माध्यमांकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे. वर्षभरामध्ये अकोला जिल्ह्यातील दोन हजार ८२१ विद्यार्थी मराठी माध्यमांमध्ये दाखल झाले आहेत. इंग्रजी विषयाचे वाढते आकर्षण आणि प्रस्थ वाढलेले असताना, विद्यार्थी मराठी माध्यमामध्ये प्रवेश घेत आहेत. ही बाब सकारात्मक असून, विद्यार्थ्यांसह पालकांचा मराठीकडे कल वाढला पाहिजे, यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मराठी भाषेविषयी करण्यात येत असलेली जागरुकता, जिल्हा परिषद शाळांमधील वाढत असलेले गुण यामुळे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद मराठी माध्यमांच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढत आहे. लोकसहभागातून शाळा डिजिटल होत असून, भौतिकसुद्धा उपलब्ध होत आहेत. एवढेच नाही तर अनेक जिल्हा परिषद शाळांनी कॉन्व्हेंट शाळासुद्धा सुरू केल्या आहेत. त्यामुळे पालकांचा ओढा आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांऐवजी मराठी माध्यमांच्या शाळांकडे वाढत असल्याचे चित्र आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांकडे कल वाढत आहे. विद्या प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये यंदा ९0 हजारावर विद्यार्थी इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यम सोडून मराठी माध्यमांकडे वळले आहेत. अकोला जिल्ह्यात ९५७ शाळांमध्ये दोन हजार ८७१ विद्यार्थी मराठी माध्यमामध्ये दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, पोषण आहार योजनांसोबतच शैक्षणिक उपक्रमसुद्धा राबविण्यात येत असल्यामुळे या शाळांमधील शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्ता उंचावत आहे. यंदा तर जिल्ह्यातील बोर्डी, दिग्रस, वाडेगाव आणि सिंदखेड मोरेश्वर येथील जिल्हा परिषद शाळांना महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाकडून आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या शाळांना आता आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार शिक्षण मिळणार असल्याने, या भागातील पालकांनी कॉन्व्हेंटमध्ये टाकलेल्या मुलांची नावे काढून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये घातली आहेत.

कॉन्व्हेंटच्या तुलनेत मराठी शाळाच बरी!
शिक्षण तज्ज्ञांच्या मते, इंग्रजी माध्यमांमधील मुले पुढे स्पर्धा परीक्षांमध्ये टिकत नाहीत. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून मराठी माध्यमच हवे, याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये होणारी चर्चा आणि जिल्हा परिषद शाळांची वाढत असलेली गुणवत्ता लक्षात घेता, पालकांचा कल मराठी माध्यमांकडे वाढत आहे. हजारो रुपये डोनेशन भरून कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतल्यापेक्षा जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये प्रवेश घेतला तर खर्चही फार येत नाही. गणवेश, पाठ्यपुस्तके, पोषण आहारही मिळतो. त्यामुळे हजारो रुपये डोनेशन भरण्यापेक्षा आपली मराठी शाळाच बरी, अशी मानसिकता बदलत आहे.


  • जिल्ह्यातील एकूण शाळा- ९५७

  • मराठी माध्यमांकडे वळलेले मुले- २८७१
  • जि.प.च्या आंतरराष्ट्रीय शाळा- 0४

 

Web Title: Two thousand students leaving English, Semi English school and join marathi school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.