हुंडीवाले हत्याकांडातील दोन फरार आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 16:43 IST2020-03-06T16:42:59+5:302020-03-06T16:43:05+5:30

प्रवीण श्रीराम गावंडे आणि मंगेश श्रीकृष्ण गावंडे या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी दुपारी अकोल्यातूनच अटक केली.

Two absconding accused arrested in Hundiwale massacre | हुंडीवाले हत्याकांडातील दोन फरार आरोपी अटकेत

हुंडीवाले हत्याकांडातील दोन फरार आरोपी अटकेत

अकोला : अखिल भारतीय गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांच्या हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी मुन्ना ऊर्फ प्रवीण श्रीराम गावंडे आणि मंगेश श्रीकृष्ण गावंडे या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी दुपारी अकोल्यातूनच अटक केली. हे दोन्ही आरोपी घटनेच्या दिवसापासून फरार होते. त्यांना शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
स्वामी विवेकानंद राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ, कौलखेड या शैक्षणिक संस्थेतील सभासदांच्या निवड प्रक्रियेचा वाद २०१४ पासून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सुरू आहे. याच वादाच्या प्रकरणात सोमवार, ६ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान किसनराव हुंडीवाले न्यास नोंदणी कार्यालयात त्यांचा मुलगा प्रवीण यांच्यासोबत उपस्थित असताना भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, मुन्ना ऊर्फ प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सूरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे, सतीश सुखदेव तायडे, विशाल सुखदेव तायडे, मयूर गणेशलाल अहिरे, दिनेश ठाकूर, प्रतीक दत्तात्रय तोंडे, मंगेश श्रीकृष्ण गावंडे व मोहम्मद साबीर यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात येऊन किसनराव हुंडीवाले यांची हत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी मोहम्मद साबीर, मुन्ना ऊर्फ प्रवीण श्रीराम गावंडे, मंगेश श्रीकृष्ण गावंडे हे तिघे फरार झाले होते. गत आठवड्यात साबीर याला कर्नाटकातून अटक केल्यानंतर मुन्ना गावंडे व मंगेश गावंडे या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी श्रीराम कसदन गावंडे यास तब्बल एक वर्षापर्यंत न्यायालयासमोर जामीन अर्ज करण्यास मनाई करण्यात आली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या दोन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या दोन्ही आरोपींना शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास त्यांच्याकडूनच करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

Web Title: Two absconding accused arrested in Hundiwale massacre