Transfer eligible Primary teachers list will be ready! | बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांची यादी तयार होणार!
बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांची यादी तयार होणार!

अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या येत्या काही दिवसांमध्ये बदली करण्यात येणार आहेत. शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात बुधवारी प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांची यादी तयार करण्याचे निश्चित करण्यात आले.
प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग रजेवर गेल्या असताना, त्यांच्याकडील पदभार माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्याकडे देण्यात आला आहे. उपशिक्षणाधिकारी पदाचा पदभार देवेंद्र अवचार यांच्याकडे देण्यात आला असून, त्यांनी शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांच्यासह सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी प्राथमिक शिक्षण विभागाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बदलीपात्र शिक्षकांची माहिती संकलित करून यादी तयार करण्यासोबतच मॅपिंग करणे, पीयूसी करणे आणि अवघड क्षेत्र निश्चित करण्यात येणार आहे. सर्वसाधारण क्षेत्राची यादीसुद्धा तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोणते अवघड क्षेत्र आहे, याचीसुद्धा यादी निश्चित करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. बदलीपात्र शिक्षकांची यादी आणि अवघड क्षेत्राची यादी तयार झाल्यानंतरच बदली प्रक्रियेला वेग येणार आहे. (प्रतिनिधी)

 


Web Title: Transfer eligible Primary teachers list will be ready!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.