ताशी ११० किमी वेगाने धावली रेल्वे; अकोला-अकोट ब्रॉडगेज चाचणी यशस्वी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 11:11 PM2020-07-24T23:11:11+5:302020-07-24T23:15:01+5:30

शुक्रवारी पहिल्यांदाच या मार्गावर ताशी ११० किमी वेगाने विशेष परीक्षण रेल्वे गाडी चालविण्यात आली.

The train ran at a speed of 110 km per hour; Akola-Akot broad gauge test successful | ताशी ११० किमी वेगाने धावली रेल्वे; अकोला-अकोट ब्रॉडगेज चाचणी यशस्वी 

ताशी ११० किमी वेगाने धावली रेल्वे; अकोला-अकोट ब्रॉडगेज चाचणी यशस्वी 

Next

अकोला : दक्षिण-मध्य रेल्वेच्या अकोला ते खांडवा मीटरगेज मार्गावरील अकोला ते अकोट या ४४ किमी लांबीच्या पट्ट्याचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन झाल्यानंतर शुक्रवारी पहिल्यांदाच या मार्गावर ताशी ११० किमी वेगाने विशेष परीक्षण रेल्वे गाडी चालविण्यात आली. रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या दोन दिवसीय चाचणी व पाहणी दौऱ्यात या मार्गाची चाचणी यशस्वी झाल्याची माहिती आहे.
अकोला ते खांडवा हा १७४ किलोमीटर लांबीचा मीटरगेज मार्ग ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित करण्याचे काम सुरू असून, अकोला ते अकोटपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. गत वर्षी मे महिन्यात या मार्गावरून इंजीन चालवून पाहणी करण्यात आली होती. तसेच या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मालगाडी चालविण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात या लोहमार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असून, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अकोला येथील रेल्वेस्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगचे काम पूर्ण झाले. गेज परिवर्तनाच्या कामासोबतच या मार्गावरील पुलांचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गाची पाहणी व चाचणी घेण्यासाठी दक्षिण-मध्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त राम कृपालु, मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण) अमित गोयल व दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड मंडळाचे प्रबंधक उपिंदर सिंह यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी अकोल्यात आले होते. गुरुवारी अकोला ते गांधी स्मारक, गांधी स्मारक ते पाटसूल, पाटसूल ते अकोट असे टप्पानिहाय मोटार ट्रॉली व धिम्या गतीने विशेष परीक्षण रेल्वेगाडी चालवून चाचणी घेण्यात आली. यामध्ये कोणतीही त्रुटी न आढळून आल्यामुळे या मार्गावर ताशी ११० किमी वेगाने विशेष परीक्षण रेल्वे चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता फलाट क्रमांक सहावरून सर्व अधिकाऱ्यांना घेऊन विशेष रेल्वे अकोटकडे रवाना झाली. यावेळी रेल्वे ताशी ११० किमी वेगाने चालविण्यात आली. अकोटला पोहोचल्यानंतर तेथे अधिकाºयांनी स्टेशनची नवीन इमारत, तेथील सेवा-सुविधा व इतर बाबींचा आढावा घेतला. अकोटवरून सायंकाळी ४ वाजता विशेष परीक्षण रेल्वे अकोल्याकडे रवाना झाली. यावेळीही रेल्वे ताशी ११० किमी वेगाने चालविण्यात आली. रेल्वे मार्गाच्या यशस्वी चाचणीनंतर आता रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून प्रमाणपत्र जारी करण्यात येणार असून, त्यानंतरच या मार्गावरून प्रवासी गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

Web Title: The train ran at a speed of 110 km per hour; Akola-Akot broad gauge test successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.