युवकाच्या हत्येप्रकरणी तिघा आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी
By Admin | Updated: May 18, 2014 20:09 IST2014-05-18T19:57:18+5:302014-05-18T20:09:36+5:30
अकोला जिल्ह्यातील नायगाव येथील तरूणाच्या हत्याप्रकरणातील आरोपींना शुक्रवार पर्यंत पोलिस कोठडी

युवकाच्या हत्येप्रकरणी तिघा आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी
अकोला : नायगावातील २८ वर्षीय युवकाची किरकोळ कारणांवरून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आकोट फैल पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केलेल्या तीन आरोपींना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघाही आरोपींना शुक्रवार, २३ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगावात राहणारा अहमद बन्सी दर्गेवाले (२८) याची शनिवारी रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास नायगावातच राहणारे इमरान रजा खान, वहीद बेग, अजिमोद्दीन बद्रुद्दीन यांच्यासह आणखी दोन युवकांनी तलवार, चाकू व बीअरच्या बाटलीच्या काचेने वार करून त्याची हत्या केली. या प्रकरणी आकोट फैल पोलिसांनी तिघा युवकांना ताब्यात घेतले असून, दोन युवक अद्यापही फरार आहेत. आरोपी इमरान खान, वहीद बेग, अजिमोद्दीन बद्रुद्दीन यांना रविवारी ३.३0 वाजताच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघाही आरोपींना २३ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मृतक अहमद दर्गेवाले हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमालीचे काम करायचा. त्याला दारूचे व्यसन होते. शनिवारी रात्री अहमद दारू पिवून आला. नायगावातील अमानखाँ पेढेवाले यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या मशिदीतील लोकांना त्याने अश्लील शिवीगाळ करणे सुरू केले. एवढेच नाही तर त्याने दारूच्या नशेत मशिदीतील तुम्ही लोकं धर्माच्या नावाखाली नागरिकांकडून पैसा घेता. तो पैसा कोठे जातो, अशी विचारणा केली. असा प्रकार अहमद दर्गेवाले दररोज करीत असल्याने परिसरातील युवक कंटाळले होते. शनिवारी मशीद परिसरातील पाच ते सहा युवकांनी संगनमत करून अहमदवर तलवार, चाकू व बीअरच्या बाटलीने वार केले. त्याच्या पोटावर तलवार व चाकूने घाव घातले. आकोट फैल पोलिस आणखी दोघा आरोपींचा शोध घेत आहेत.