अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा नाट्यमय थरार! अपहरणकर्त्याच्या कारची पोलिस वाहनाला धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 00:09 IST2025-02-27T00:09:03+5:302025-02-27T00:09:43+5:30

Akola Crime News: अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या कारचा पोलिसांनी पाठलाग केला असता, गडबडीत कारचालकाने नियंत्रण गमावून पोलिसांच्या गाडीला धडक दिली. एवढेच नव्हे, तर एका दुचाकीस्वारालाही धडक देत त्याला जखमी केले.

The dramatic thrill of the kidnapping of a minor girl! The kidnapper's car collided with the police vehicle | अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा नाट्यमय थरार! अपहरणकर्त्याच्या कारची पोलिस वाहनाला धडक

अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा नाट्यमय थरार! अपहरणकर्त्याच्या कारची पोलिस वाहनाला धडक

अकोला - अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या कारचा पोलिसांनी पाठलाग केला असता, गडबडीत कारचालकाने नियंत्रण गमावून पोलिसांच्या गाडीला धडक दिली. एवढेच नव्हे, तर एका दुचाकीस्वारालाही धडक देत त्याला जखमी केले. हा धक्कादायक प्रकार बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी दुपारी डाबकी रोडवर घडला. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आरोपीसह अपहृत मुलीला ताब्यात घेतले.

बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी अमित बेडवाल (२२ वर्षे) याने छत्रपती संभाजीनगरमधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान, बुधवारी आरोपी कारमधून अकोला जिल्ह्यात पोहोचल्याची माहिती पोलिसांना मिळाली. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी तत्काळ बुलढाणा पोलिसांना कळवले. त्यानुसार बुलढाणा पोलिसांनी पाठलाग सुरू करताच आरोपीने वेगाने वाहन चालवत अकोल्याचा मार्ग धरला. अकोला पोलिसांना माहिती मिळताच, डाबकी रोड पोलिसांनी नाकाबंदी केली. त्यामुळे आरोपी गोंधळला आणि त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेल्या कारने पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक दिली, ज्यामुळे पोलिसांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले. याच दरम्यान, एका दुचाकीस्वारालाही कारने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. डाबकी रोड पोलिस ठाण्याचे अधिकारी धर्मा सोनोने यांच्या मार्गदर्शनाखालील डी. बी. पथकाने हा वाहनाचा पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले. सहायक पोलिस निरीक्षक पहुरकर, सुनील टोपकर तसेच हवालदार दीपक तायडे, रवी इंगळे, सुनील काळे, मंगेश इंगळे यांनी ही कारवाई केली.

एफआयआर दाखल; पुढील तपास सुरू
या प्रकरणी आरोपीवर अपहरण, निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि सरकारी कामात अडथळा आणण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डाबकी रोड पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे एका मुलीचे प्राण वाचले तसेच आरोपीला अटक करण्यात यश आले.

Web Title: The dramatic thrill of the kidnapping of a minor girl! The kidnapper's car collided with the police vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.