उमेदवारीसाठी थेट प्रदेश पातळीवरून चाचपणी
By Admin | Updated: August 26, 2014 22:01 IST2014-08-26T22:01:59+5:302014-08-26T22:01:59+5:30
अकोला पश्चिम मतदारसंघ: इच्छुकांमध्ये रस्सीखेच

उमेदवारीसाठी थेट प्रदेश पातळीवरून चाचपणी
अकोला : विधानसभेच्या अकोला पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी कॉंग्रेस इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. या मतदारसंघातून सक्षम उमेदवारासाठी थेट प्रदेशपातळीवरून चाचपणी करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच प्रदेश पातळीवरील एका मोठय़ा नेत्याच्या खासगी सहाय्यकाने जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांची चर्चा करून माहितीही संकलित केली आहे. उमेदवारीसाठी कोणत्या समाजाचे किती मते आहेत, याचाही आढावा घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील कॉँग्रेसमधील दिग्गज इच्छुकांनी उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी ह्यफिल्डिंगह्ण लावली. जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, आकोट, बाळापूर, मूर्तिजापूर या पाच मतदारसंघांसाठी इच्छुकांनी कॉँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाकडून अर्जही घेतले होते. जिल्ह्यातून एकूण ७२ इच्छुकांचे अर्ज प्रदेश कार्यालयात पाठविण्यात आले. सर्वात जास्त १८ अर्ज अकोला पश्चिम मतदारसंघातील इच्छुकांचे पाठविण्यात आले. जिल्ह्यात उमेदवारीसाठी सर्वात जास्त रस्सीखेच अकोला पश्चिम मतदारसंघात सुरू आहे. उमेदवारीवरून पक्षात ह्यपॅनलह्णबाजीही सुरू आहे. या पॅनलचे सदस्य पॅनलमधील कोणालाही उमेदवारी देण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा करीत आहेत. दरम्यान, अकोला पश्चिम मतदारसंघासाठी आता थेट प्रदेश पातळीवरील मोठय़ा नेत्याकडून चाचपणी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या नेत्याच्या खासगी सहाय्याने दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील एका ज्येष्ठ नेत्याची भेटही घेतली. स्वीय सहाय्यकाने इच्छुक असलेल्या एका डॉक्टरबाबतही माहिती संकलित केल्याचे समजते.